पुणे – 4,756 जणांना उद्या मिळणार हक्‍काचे घर

पुणे -“म्हाडा’च्या 4 हजार 756 सदनिकांसाठी एकूण 41 हजार 501 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. फेब्रुवारीत राबविण्यात आलेल्या योजनेची ऑनलाइन सोडत येत्या शुक्रवारी सकाळी 10 वाजता अल्प बचत भवन येथे होणार आहे. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, पुणे मंडळाचे सभापती समरजितसिंह घाटगे, तसेच म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडणार आहे.

समाजातील आर्थिक दुर्बल घटक, अल्प, मध्यम, तसेच उच्च उत्पन्न गटातील गरजूंकरिता परवडणाऱ्या किंमतीत शासनाने घरकुल निर्माण केली आहेत. म्हाडा अंतर्गत पुणे विभागातील सातारा जिल्हा वगळता अन्य चार जिल्ह्यांत चार हजार 756 घरांसाठी फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, चाकण एमआयडीसी येथील म्हाळुंगे गाव आदी ठिकाणी वन आरके, वन बीएचके, टू बीएचके आणि रो हाऊस आदी प्रकारची घरे आहेत.

त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1 हजार 662 सदनिका असून, 3 हजार 69 अर्ज, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत 2 हजार 237 सदनिकांसाठी 4 हजार 31 आणि शासनाच्या 20 टक्के सर्व समावेशक योजनांमार्फत 857 सदनिकांसाठी 34 हजार 401 अर्ज प्राप्त झाले आहेत.

पुणे शहर व जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 70, तर म्हाडाच्या एक हजार 836 अशा एक हजार 906 सदनिका आहेत. शुक्रवारी सकाळी 10 वाजता ऑनलाइन सोडतीस सुरवात होणार आहे. यशस्वी अर्जदारांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.