पीएमपीच्या 40 बसेस पुन्हा येणार मार्गावर

काही वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद असणाऱ्या बसेसची दुरुस्ती

पुणे -मागील काही वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद असणाऱ्या बसेस सुरू करून संचलनात आणण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनाकडून सुमारे 40 बसेसच्या दुरुस्तीचे नियोजन असून, त्यापैकी अनेक बसेसची दुरुस्ती पूर्ण झाली आहे, तर बसेस देखभालीसाठी कर्मचाऱ्यांसाठी “बस दत्तक योजना’ राबवण्यात येत आहे.

यामुळे बसच्या तांत्रिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) ताफ्यात 2 हजारपेक्षा अधिक बसेस आहेत. यामध्ये डिझेल, सीएनजी आणि काही इलक्‍ट्रिक बसेसचा समावेश आहे. त्यापैकी अनेक पीएमपीच्या मालकीच्या आहेत. या बसेसपैकी काही स्पेअरपार्ट न मिळणे, तांत्रिक कारणे आदींमुळे स्क्रॅप कराव्या लागतात.

मात्र, आता प्रशासनाने स्पेअरपार्टअभावी बंद असणाऱ्या बसेस दुरुस्त करण्यात येत आहेत. पीएमपीच्या 13 आगारांत स्पेअरपार्टअभावी सुमारे 2 वर्षे 40 बसेस बंद अवस्थेत होत्या. त्यापैकी 30 बसेसचे काम कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले असून, त्यांची आरटीओ पासिंगची प्रक्रियादेखील पूर्ण केली आहे.

अनेक वर्षे या गाड्या एका जागी उभ्या असल्याने तांत्रिक बिघाड झाला आहे. सध्या संचलन बंद असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण कमी आहे. दरम्यान, या बसेसच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात येत आहेत. त्यापैकी 30 बसेस दुरुस्त करण्यात आणि बसेसचे स्पेअरपार्ट उपलब्ध करण्यात विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश आल्याचे पीएमपीचे मुख्य अभियंता अनंत वाघमारे म्हणाले.

बसेसच्या दुरुस्तीसाठी बस दत्तक योजना
मार्गावर सातत्याने बंद पडणे, ब्रेकडाऊनसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. गाडी मार्गावर बंद पडल्यानंतर ती जवळील डेपोमध्ये दुरुस्तीसाठी नेली जाते. डेपोमधील वर्कशॉप कर्मचाऱ्यांकडून देखभाल दुरुस्तीचे कामे केली जातात. मात्र, याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी दत्तक योजना सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांना दत्तक योजनेंतर्गत बसेस दत्तक देण्यात येत असून, संबंधित कर्मचाऱ्यांकडे बसेसच्या दुरुस्तीची जबाबदारी सोपवली आहे. यामुळे सदर बसेसच्या देखभाल दुरुस्तीची पूर्ण माहिती एकाच कर्मचाऱ्याकडे राहणार असून, यामध्ये 13 डेपोंतील कर्मचाऱ्यांना पीएमपीच्या ताफ्यातील प्रत्येकी एक बस दत्तक देण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.