विधानपरिषद निवडणूक मतमोजणीचे पेलले आव्हान
– गणेश आंग्रे
पुणे – विधानपरिषदेची शिक्षक व पदवीधर ही निवडणूक मतपत्रिकेवर पसंतीक्रमांक देऊन होत असते. त्यामुळे या निवडणुकीसाठी मतमोजणीची प्रक्रियासुद्धा वेगळी असते. पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामुळे या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पाचही जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणा काम करत होती.
मतमोजणीसाठी सुमारे 500 अधिकारी तर 2500 कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. मतमोजणीच्या दिवशी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी-कर्मचारी हे गुरुवारी पहाटे पाच वाजताच बालेवाडी येथे मतमोजणीच्या केंद्रांवर हजर झाले. प्रत्यक्ष मतमोजणी आणि त्यानंतर मतमोजणीनंतर करावयाची पुढील कागदोपत्री पूर्तता तसेच मतपत्रिका पुन्हा सीलबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे कर्मचारी शुक्रवारी रात्रीपर्यंत काम करत होते. त्यामुळे शिक्षक व पदवीधर मतमोजणीसाठी महसूल कर्मचारी 40 तास कार्यरत होते.
निवडणूक आयोगाच्या कामकाजाकडे जबाबदारीने पाहिले जाते. निवडणुकीच्या कामाला प्रशासनही प्राधान्य देते. मतदानाबरोबर मतमोजणीचे काम ही आव्हानात्मक असते. मतपत्रिकेवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणी करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असते. त्यामुळे या मतमोजणीसाठी अधिक बारकाईने लक्ष द्यावे लागते. पदवीधरसाठी तब्बल 62 उमेदवार असल्याने मतपत्रिका सुद्धा मोठ्या आकाराची होती. तर, शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात होते.
पदवीधरसाठी 2 लाख 47 हजार 687 मतदान झाले होते. तर, शिक्षक मतदानासाठी 52 हजार मतदान झाले होते. मतदानाची वाढलेली टक्केवारी, उमेदवारांची मोठी संख्या आणि पसंतीक्रमानुसार मोजायचे मतदान यामुळे मतमोजणीसाठी वेळ लागत होता. एक मतपत्रिका उघडल्यावर ती मतपत्रिका बाद आहे का, तसेच पसंतीक्रमानुसार मतदान मोजायचे यासाठी एका मतपत्रिकेसाठी सुमारे दीड ते तीन मिनिटे लागत होती. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी असतात. तर पाच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतात. त्यामुळे या मतमोजणीसाठी पाच जिल्ह्यांतील महसूल यंत्रणा काम करत होती.
राबली मोठी यंत्रणा…
उमेदवारांची मोठी संख्या आणि मतदानाची वाढलेले प्रमाण यामुळे यंदाची निवडणूक ही आव्हानात्मक होती. मतमोजणी दि. 3 डिसेंबरला असली तरी आधीच्या दिवसापासून अधिकारी मतमोजणीचे नियोजन करण्यात व्यस्त होते. तर, दि. 3 डिसेंबरला सकाळी आठ वाजता सुरू झाल्यानंतर सलगपणे मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. यासाठी जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी – 20, उपजिल्हाधिकारी -100, तहसीलदार – 100, नायब तहसीलदार -200, महसूल कर्मचारी 2,500 काम करीत होते.