पुणे: करोना बाधितांसाठी खासगी रुग्णालयातील ताब्यात घेतलेल्या 80 टक्क्यांमधील 40 टक्के बेड रुग्णालयांच्या ताब्यात दिले आहेत. तरीही आणखी 40 टक्के बेड महापालिकेने स्वत:च्या ताब्यात ठेवले आहेत.
15 फेब्रुवारीपासून बाधितांची संख्या वाढण्याला सुरुवात झाली आणि मार्च, एप्रिलमध्ये रुग्णांना बेडही मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. अशावेळी महापालिकेने अनेक रुग्णालयांना कोविड बाधितांसाठी संपूर्ण रुग्णालय देण्याचीही विनंती केली. काही मोठ्या रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेतले. जे देत नाहीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला.
3 मेपासून बाधितांची संख्या कमी होण्याला सुरुवात झाली आहे. 25 ते 30 टक्क्यांवर असलेला बाधितांचा दर आता साडेतीन टक्क्यांवर आला आहे. या परिस्थितीत अनेक बेड शिल्लक राहात आहेत. अशा परिस्थितीत त्या बेडवर अन्य आजाराच्या रुग्णांना दाखल करून घेता यावे किंवा नियोजित सर्जरीसाठी हे बेड उपयोगात आणता यावेत यासाठी महापालिकेने 40 टक्के बेड “रिलीज’ करून टाकले आहेत. मात्र पुन्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित रुग्णालयांनी हे बेड महापालिकेच्या ताब्यात देण्याची अट यामध्ये घालण्यात आली आहे.