पुणे – शिक्षकांच्या 121 जागांसाठी 372 जणांच्या मुलाखती

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नप्राप्त शाळांसाठी नेमणुका

पुणे – महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त केलेल्या शाळांमध्ये प्रतिनियुक्तीवर शिक्षकांच्या नेमणुका करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षकांच्या 121 जागांसाठी 803 जणांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले असून 372 जणांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. आता कोणाची निवड होणार, याची उत्सुकता शिक्षकांना लागली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने सन 2019-20 या शैक्षणिक वर्षांसाठी आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाची 100 शाळांना संलग्नता प्राप्त करुन देण्याचे नियोजन करण्यात आले होते. आतापर्यंत यातील 70 शाळांची अंतिम निश्‍चिती करण्यात आली आहे. यात 22 शाळा या खासगी अनुदानित व स्वयंअर्थसहायित असून इतर सर्व शाळा शासकीय अनुदानित आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांची प्रतिनियुक्तीने अथवा बदलीने नियुक्ती करण्यात येणार आहे.

अशी होणार नियुक्‍ती
शिक्षक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याबरोबरच लेखी परीक्षाही घेण्यात आली, समूह चर्चा, पाठही घेण्यात आले. उमेदवारांच्या व्यक्‍तिमत्वाची तपासणीही करण्यात आली. उमेदवाराचे बोलणे, चालणे, वागणे, राहणीमान याचीही चाचपणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या निवड परिषदेच्या विविध गटांमार्फत यांची विविध पातळ्यांवर परीक्षा घेण्यात आली आहे.

एका जागेसाठी तीन शिक्षक
अर्ज दाखल करण्यासाठी शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा लागल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. यातील 1 जागेसाठी 3 याप्रमाणे शिक्षकांना मुलाखतीसाठी निवड समितीसमोर सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी (दि.24) 175 व शनिवारी (दि.25) 197 शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. येत्या 28 मे रोजी निवड परिषदचा निकाल जाहीर होणार असून निवड झालेल्या शिक्षकांना 3 ते 9 जून या कालावधीत निवासी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे.

13 शिक्षकांनी केले दुबार अर्ज
अकोला जिल्ह्यातील 7 शिक्षकांच्या जागांसाठी 5, अहमदनगर-1-21, उस्मानाबाद-13-52, औरंगाबाद-3-67, कोल्हापूर-3 -28, गोंदिया-2-22, चंद्रपूर-1-11, नांदेडमध्ये 10-159, नाशिक-11-61, परभणी-10-66, पुणे-9-74, बुलढाणा-14-63, रत्नागिरी-4-26, लातूर-3-33, सांगली-14-39, सातारा 16-76 याप्रमाणे शिक्षकांनी अर्ज दाखल केले आहेत. एकूण ऑनलाइन अर्जात 13 शिक्षकांनी दुबार अर्ज दाखल केल्याचे उघड झाले आहे.

जिल्हानिहाय मुलाखती घेतलेल्या शिक्षकांची संख्या
निवड परिषदेने जिल्हानिहाय शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यात अकोला-3, अहमदनगर-6, उस्मानाबाद-26, औरंगाबाद-14, कोल्हापूर-12, गोंदिया-12, चंद्रपूर-6, नांदेड-43, नाशिक-39, परभणी-40, पुणे-31, बुलढाणा-35, रत्नागिरी-18, लातूर-12, सांगली-28, सातारा-47 याप्रमाणे शिक्षक मुलाखतीसाठी उपस्थित राहिले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×