पुणे – करोना बाधितांची सोमवारी कमी झालेली बाधितांची संख्या मंगळवारी सुमारे हजाराने वाढली. गेल्या 24 तासांत 2 हजार 404 बाधितांची नोंद झाली. शहरात गेल्या चोवीस तासांत बरे झालेल्या 3 हजार 486 करोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 76 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 24 बाधित पुण्याबाहेरील आहेत.
एकूण बाधितांची संख्या आता 4 लाख 50 हजार 133 नोंदवण्यात आली. तर 4 लाख 12 हजार 970 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण मृतांची संख्या 7 हजार 461 झाली आहे. दिवसभरात संशयितांच्या स्वॅब टेस्टही कमी झाल्या असून, मंगळवारी 11 हजार 996 संशयितांची टेस्ट करण्यात आली.
ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 30 हजारांखाली
दरम्यान, शहरात करोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत लक्षणीय घट झाली आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार सध्या ती 29 हजार 702 इतकी आहे. मात्र, गंभीर रुग्णांची संख्या 1 हजार 399 असून, ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या 6 हजार 645 आहे. त्यामुळे गंभीर रुग्णसंख्या, ऑक्सिजनवरील रुग्ण आणि मृतांची संख्या अद्याप तुलनेने कमी होत नसल्यामुळे करोना प्रादुर्भावाचा धोका टळला असे म्हणता येणार नाही, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.