पुणे – निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात संवेदनशील अशा मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघांत 330 मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले. या केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
विविध निकषांच्या आधारे निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासन हे संवेदनशील मतदान केंद्रे जाहीर करतात. त्यासाठी या दोन्ही विभागांच्या बैठकाही झाल्या आहेत. त्यानुसार संयुक्तपणे संवेदनशील मतदान केंद्रांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जिल्ह्यात मतदारांची संख्या वाढल्याने सुमारे 900 मतदान केंद्रे वाढली आहेत. पुणे-1 हजार 944, बारामती-2 हजार 372, मावळ-2 हजार 504, शिरूर लोकसभा मतदारसंघात 2 हजार 296 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दि. 23, तर शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी दि.29 एप्रिलला मतदान होणार आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय पोलिसांना सुरक्षेसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या संवेदनशील मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
संवेदनशील मतदान केंद्र निवडीचे निकष
* मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र असण्याचे प्रमाण कमी आहे.
* यादीमध्ये मयत, दुबार आणि स्थलांतरीत मतदारांचे प्रमाण जास्त आहे.
* ज्या मतदान केंद्रावर यापूर्वी 90 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. तसेच या ठिकाणी एकाच उमेदवाराला 75 टक्के मतदान मिळाले आहे.
* मतदान केंद्रावर गोंधळ, भांडणे, गैरप्रकार किंवा वारंवार एकाच मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड होणे
विधानसभा मतदारसंघाचे नाव – संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या
वडगावशेरी- 16
शिवाजीनगर -25
कोथरुड – 14
पर्वती- 36
पुणे कॅन्टोन्मेंट – 19
कसबा पेठ – 8
दौंड – 11
इंदापूर – 19
बारामती – 14
पुरंदर -5
भोर -18
खडकवासला – 25
मावळ -30
चिंचवड -14
पिंपरी- 22
जुन्नर-6
आंबेगाव -5
खेड -3
शिरूर-19
भोसरी-9
हडपसर-12