पुणे – घोड्यांच्या शर्यतीवर बंद असतानाही घोड्यांच्या सरावावर बेकायदा ऑन लाईन बेटींग घेणाऱ्यांवर शहर पोलिसांनी छापामारी केली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी कारवाई करत तब्बल 31 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु होती. ही कारवाई प्रामुख्याने वानवडी, कोंढवा, हडपसर परिसरात करण्यात आली.
या कारवाईत बेटींग घेणाऱ्यांकडून, गुन्ह्यात वापरलेले 31 मोबाईल, सहा लॅपटॉप व रोकड असा 3 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बेकायदेशीरपणे घोड्यांच्या रेसवर ऑन लाईन बेटींग घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची पथके तयार करून ठिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये 31 जणांना बेटींग घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
कोरोनामुळे रेसकोर्सवरील घोड्यांच्या शऱ्यती बंद आहेत. मात्र घोड्यांचा सराव सुरू राहावा म्हणून घोडे पळवले जातात. तेथील काही बुकींनी बेटींग घेण्यासाठी मोबाईल ऍप तयार केले आहे. रेसकोर्सच्या परिसरात अधिकृत बुकींना बेटींग घेण्यास नियमानुसार परवानगी आहे. मात्र रेसकोर्सच्या बाहेर ही बेटींग घेता येत नसल्याचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले. त्यानुसेर संबधीत आरोपी नियमांचे उल्लंघन करून बेटींग घेत होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
डोंबरवाडी परिसरातील महालक्ष्मी मंदिराजवळील येथे मोकळया जागेमध्ये शुक्रवारी दुपारी बेकायदेशीरपणे बेटिंग घेण्यात येत होते. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 20 जणांना अटक केली. याप्रकरणी उपनिरीक्षक हणमंत गिरी यांनी तक्रार दिली आहे. तर, वानवडीतील नॅन्सी टॉवर कारवाई केली आहे.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे यांनी तक्रार दिली आहे. वानवडीतील पद्मविला सोसायटी परिसरात केलेल्या कारावईत प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी तक्रार दिली आहे. या ठिकाणाहून 51 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, करोनामुळे घोड्यांच्या शर्यती बंद आहेत. मात्र त्यांचा नियमीत सराव सुरु आहे. येथील काही बुकींनी ही सरावर करणाऱ्या घोड्यांवर बेटींग घेण्यासाठी एक मोबाईल ऍप तयार केले होते. रेसकोर्सवर बेटींग घेण्यास नियमानुसार परवानगी आहे. मात्र रेसकोर्सच्या बाहेर बेटींग घेता येत नाही.