पुणे : शिवाजीनगर न्यायालयात ३०० जणांना करोना प्रतिबंधक लस

पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सोमवारी (दि.१०) लसीकरण करण्यात आले. पुणे बार असोसिएशनच्या प्रयत्नाने महापालिका प्रशासनाने आयोजित लसीकरण मोहिमेत न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी अशा एकूण ३०० जणांना लस देण्यात आली. डॉ. श्रुती भोसले, आकाश सौदे, अशरफ शेख, लोखंडे यांनी लसीकरण केले.

महापालिकेने परवानगी दिल्यास दर आठवड्याला, अशी लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त न्यायाधीश, वकील व न्यायालयीन कर्मचारी यांचे लसीकरण करता येर्इल. लसीकरणादरम्यान सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी केले. करोनामुळे गेल्या तीन महिन्यांत ३५ हून अधिक वकिलांचा मृत्यू झाला आहे. हे सांगुनऍड. मुळीक म्हणाले, करोनाचा एक वर्षांहून अधिक काळापासून न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

केवळ अंशतः काम चालत आहे. त्यामुळे लोकांना न्याय मिळत नाही. या पार्श्वभूमीवर अधिक प्रमाणात वकील, न्यायाधीश यांना लस उपलब्ध करून देण्याचा बारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर दर आठवड्याला लसीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे अर्ज करणार आहे. आठवड्याला ३०० लसी देण्याची मागणी आहे. जेणेकरून न्यायालयाचे कामकाज लवकरात लवकर सुरू होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.