पुणे -फ्लेक्‍सचा कचरा करणाऱ्यांना 3 हजारांचा दंड

फ्लेक्‍सचा कचरा करणाऱ्यांना 3 हजारांचा दंड; दैनिक “प्रभात’च्या वृत्तानंतर प्रशासनाकडून कारवाई

पुणे – नदीपात्रातील रस्त्यावर फ्लेक्‍सच्या प्रिंटींगचा कचरा टाकणाऱ्या जाहिरात कंपनीस महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

वर्तक उद्यानामागील नदीपात्रातील रस्त्याच्या कडेला जाहिरातींसाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लेक्‍सच्या कचऱ्याचे ढीग पडत असून ते नदीपात्रात जाळले जात असल्याचे दैनिक “प्रभात’ने समोर आणले होते. त्याची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.

वर्तक उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर जाहिरात करणारी वाहने लावली जातात. या वाहनांवर जाहिरातींचा मजकूर फ्लेक्‍सद्वारे लावला जातो. नवीन फ्लेक्‍स लावल्यानंतर जुन्या फ्लेक्‍सच्या साहित्याची विल्हेवाट न लावता ते रस्त्याच्या कडेलाच टाकले जात आहे. त्या पेक्षाही धक्‍कादायक म्हणजे, हे साठलेले साहित्य नंतर नदीपात्रात जाळले जात आहे. शहरात कचरा जाळण्यास बंदी असतानाही आधी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करून आणि नंतर कचरा जाळून राजरोसपणे नियमांचे उल्लंघन केले जात होते. हा सर्व कचरा प्लॅस्टिकचा असल्याने त्यापासून विषारी वायूचा धूरही हवेत पसरत होता. दैनिक “प्रभात’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने वर्तक उद्यानाच्या परिसरात पाहणी केली असता, ट्रिनीटी इव्हेंट्‌स प्रा. लि. या कंपनीची जाहिरातीची वाहने उभी होती. तसेच त्याचे फ्लेक्‍स बदलण्याचे काम सुरू होते. त्यामुळे या कंपनीस 3 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.