पुणे – अद्यापही 266 व्यक्तींकडून शस्त्र जमा नाही

पुणे ग्रामीण-शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये साडेअकरा हजार परवानाप्राप्त

पुणे – लोकसभा निवडणूक जिल्ह्यात शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका कार्यक्षेत सुमारे 11 हजार 50 परवानाप्राप्त शस्त्रधारक आहेत. या शस्त्रधारकांकडून शस्त्र जमा करण्याचे काम सुरू असून अद्यापही 266 व्यक्तींनी शस्त्र जमा केले नाहीत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

निवडणूक काळात यापूर्वी सर्वच परवाना धारकांकडून शस्त्र जमा करून घेतले जात होते. मात्र,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरसकट शस्त्र जमा न करता केवळ गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींकडून आणि निवडणूक काळात शस्त्राचा चुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींकडून शस्त्र जमा केले जात आहेत. त्यानुसार पुणे ग्रामीणमधून 3 हजार 825 शस्त्र जमा करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यातील 3 हजार 664 शस्त्र जमा झाले असून 33 बाकी आहेत.

शहरातून 46 शस्त्र जमा करण्याचे काम सुरू
पुणे महापालिका कार्यक्षेत्रातून 6 हजार 548 पैकी केवळ 601 शस्त्र जमा करण्याचे निश्‍चित केले होते. त्यातील 555 शस्त्र जमा झाले असून उर्वरित 46 शस्त्र जमा करण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिका क्षेत्रात प्रामुख्याने लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी आणि काही बॅंकांनी सुरक्षेसाठी शस्त्र घेतले आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 1 हजार 60 पैकी 873 शस्त्र जमा केले जाणार होते. त्यातील 727 शस्त्र जमा झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.