पुणे – मुक्‍त विद्यालयासाठी 254 ऑनलाइन अर्ज

पुणे – महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत संपली आहे. या मुदतीत एकूण 254 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. शासनाकडून मुक्त विद्यालय मंडळाच्या शाळा प्रवेशाकरिता प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी यंदा विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली.

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी फारशी नोंदणी करण्यात आली नव्हती. यानंतर नावनोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळावा, यासाठी दि.1 ते 15 फेब्रुवारी या कालावधीपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर पुन्हा 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

यंदा मुक्त विद्यालय मंडळाच्या प्रवेशाचे पहिलेच वर्ष असल्याने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीही स्थानिक पातळीवर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जवळच्या ठिकाणी असलेल्या शाळांमधील संपर्क केंद्रांवर जाऊनही माहिती घेण्याला प्राधान्य दिले आहे. ऑनलाईन अथवा ऑफलाइन अर्ज भरण्याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते.
यामध्ये पाचवीसाठी 79 तर इयत्ता आठवीसाठी 175 विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. ऑफलाईन अर्ज विद्यार्थ्यांनी संपर्क केंद्रावर दाखल केले आहेत. ते विभागीय मंडळाकडे सादर करण्यात येणार आहेत. या अर्जांची व कागदपत्रांची छाननी करुन अंतिम पात्र विद्यार्थ्यांची यादी राज्य मुक्त विद्यालय नंडळाकडे दाखल होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली आहे.

ऑनलाइन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यानंतर संपर्क केंद्रांवर अभ्यासक्रमाबाबात मार्गदर्शन करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. वेबसाईटवरील सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
– डॉ.अशोक भोसले, सचिव, राज्य मुक्त विद्यालय मंडळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)