येरवडा (संदीप घोडके) –संगमवाडीहून थेट विमानतळ भागाला जोडणारा रस्ता सरकारी लालफितशाही कारभारामुळे रखडला आहे. यासाठी अग्रसेन शाळेची जागा आवश्यक आहे, पण ती महापालिकेच्या ताब्यात आलेलीच नाही. त्यामुळे दोन वेळा भूमिपूजन होऊनही अग्रसेन शाळा ते कॉमरझोन रस्ता अर्धवटच राहिलेला आहे.
आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, विमानतळाकडे जाण्यासाठी हा मार्ग सोईचा असल्याने हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला. मात्र, तब्बल 25 वर्षे होऊनही हा रस्ता अद्यापही अर्धवटच आहे. आवश्यक जागा ताब्यात घेण्यासाठी पालिका महसूल आणि भूसंपादन विभागाकडे फक्त पत्रव्यवहार करत आहे. हा मार्ग सर्व्हे ऑफ इंडिया, बालग्राम आणि अग्रसेन शाळेच्या जागेतून जात आहे. सर्व्हे ऑफ इंडियाने जागा देण्यास मान्यता दिलेली नाही. उर्वरित बालग्राम आणि अग्रसेन शाळेच्या जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बैठक झाली होती. यात जागा विनामोबदला पालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बालग्रामची जागा ताब्यात घेऊन सीमाभिंती तसेच अनेक कामे करण्यात आली. मात्र, आता अग्रसेन शाळेची जागा ताब्यात नसल्याने 60 ते 70 फूट रस्त्याचे काम रखडलेले आहे.
आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता केला. मात्र, आता प्रशासकीय समन्वयाअभावी हा रस्ता रखडलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बालग्राम संस्थेच्या जागेचा त्वरित पंचनामा करून ती जागा पालिकेकडे हस्तांतरित करून रस्त्याचे, बालग्रामच्या सीमाभिंतीचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, रस्त्यासाठी अग्रसेन शाळेच्या जागेचा कोणता हिस्सा पालिकेला हवा आहे, याची विचारणा महसूल विभागाने केली आहे. पालिकेच्या मालमत्ता विभागाने भू संपादन विभागाकडे फाळणी-बारा नकाशा देण्यास सांगितले. त्याद्वारे किती व कोणती जागा पालिकेला पाहिजे ते सविस्तर सांगता येईल. मात्र, फेब्रुवारीत यासाठी दिलेल्या पत्राची भूसंपादन विभागाने अद्यापही दखल घेतलेली नाही.
अग्रसेन शाळेची नेमकी कोणती जागा हवी आहे, याची माहिती महसूल विभागाने मागितली आहे. त्यामुळे भूसंपादन विभागाकडे या जागेचा फाळणी बारा नकाशा मागितला आहे. तो मिळाल्यास नेमकी किती व कोणती जागा हवी आहे ते स्पष्ट होईल.
– अमित उगाडे,
कनिष्ठ अभियंता, मालमत्ता विभाग, मनपा
या रस्त्याचे काम
90% पूर्ण झाले आहे. अग्रसेन शाळेची जागा ताब्यात मिळाली, तर लवकरच रस्ता पूर्ण करण्यात येईल.
– रवींद्र पाडळे,
उपअभियंता, पथ विभाग
या रस्त्याच्या कामासाठी मी सुरुवातीपासून पाठपुरवठा करत आहे. अग्रसेन शाळा प्रशासन स्वत:हून रस्त्यासाठी जागा मोकळी करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता पूर्णत्वास येईल.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे,
माजी नगरसेवक