पुणे – करोनामुळे शहरातील व्यापारी व व्यावसायिकांवर आधीच संकट असताना महापालिकेकडून मिळकतकरावर दरमहा दोन टक्के दंडाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षाला ही दंडाची रक्कम जवळपास 24 टक्के होत आहे. तर, महापालिकेकडून शहरातील व्यावसायिकांना या दंडाच्या रकमेसह मिळकतकर भरण्याची नोटीस बजावली आहे. याबाबत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने निषेध केला असून ही दंडाची वसूली तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणीही त्यांच्या वतीने करण्यात आल्याचे संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
निवंगुणे म्हणाले, थकलेल्या मिळकतकरावर महिन्याला दोन टक्के याप्रमाणे वार्षिक 24 टक्के व्याज आकारून वसुली सुरू आहे. महापालिकेकडून तशा नोटिसा आल्या आहेत. महापालिका प्रशासनाचा हा प्रकार क्रूरतेचा कळस आहे. महापालिका निर्दयपणे वागत आहे. व्यापारी रितसरपणे मिळकतकर भरायला तयार आहेत. परंतु, गेल्या दीड वर्षापासून करोनामुळे दुकाने बंद राहिली आहेत. व्यवसाय ठप्प राहिला होता.
अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना मदत करायची सोडून त्यांना नाहक त्रास कसा वाढेल, अशी धोरणे आखली जात आहेत. मिळकत कराची अशी दामदुपटीने वसुली करणे हा त्याचाच प्रकार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि सर्व पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन आता कुठे व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे जाचक वसुली रद्द करून रितसर नियमित कर घ्यावा. त्यातही तीन ते चार टप्पे करून तो घेण्यात यावा.