पुणे – तिसऱ्या मजल्यावरुण उडी मारुण तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी धनकवडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
शुभम प्रकाश वाणी (23) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शुभम हा कला शाखेत शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. सकाळी तो रहात्या इमारतीच्या खाली नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषीत करण्यात आले. तर शुभमच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनूसार शुभमच्या वडिलांचे वर्षभरापुर्वी करोनाने निधन झाले होते. तो आई सोबत रहात होता. रविवारी रात्री जेवण झाल्यावर त्याने आईच्या पायाला आयोडेक्स लावून दिले.
यानंतर आई बेडरुममध्ये तर शुभम हॉलमध्ये झोपायला गेला. सकाळी आई उठल्यावर तीने शुभमला दुध घेऊन ये म्हणून हाक मारली. मात्र त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आई हॉलमध्ये आली पण तेथेही तो दिसला नाही. ती इमारतीतून खाली उतरत असताना तेथील रहिवाशांनी शुभम खाली पडला असल्याचे सांगितले. शुभमजवळ कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. पोलीस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.