अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध, 30 दिवसांची मुदत
पालिकेत समाविष्ट करण्यासाठी शासनाने मागवल्या हरकती, सूचना
पुणे – हद्दीलगतची 23 गावे पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने 23 गावे पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. ही गावे समाविष्ट करण्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे हरकती नोंदवता येणार आहे.
हद्दीलगतची 34 गावे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात मागील अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. त्यात 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर 23 उर्वरित गावे टप्प्याटप्याने समाविष्ट केली जाणार असल्याचे तत्कालिन सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, तीन वर्षांत त्यावर अंतिम निर्णय झाला नाही.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर 23 गावे समाविष्ट करण्यासंदर्भात हालचालींना वेग आला. तर, हा निर्णय शासनाने मागील महिन्यात घेतला. त्यानुसार नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने सकारात्मक अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द केला. यानंतर शासनाने गावे समाविष्ट करण्याचा मसुदा जाहीर केला.
अशी असणार प्रक्रिया
विभागीय आयुक्तांकडे आलेल्या हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे. तसेच नागरिकांनी दिलेल्या लेखी म्हणण्यांच्या आधारे विभागीय आयुक्त यासंदर्भातील अहवाल राज्य शासनाला पाठवणार आहेत. हरकती नोंदविण्यासाठी 30 दिवसांची मुदत आहे. 30 दिवसानंतर विभागीय आयुक्त अहवाल शासनाला सादर करणार आहे. त्यामुळे ही 23 गावे समाविष्ट करण्याची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी अथवा अंतिम निर्णय घेण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहेत.
ही गावे होणार समाविष्ट
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली.
अशी असेल पुणे शहराची नवी हद्द
उत्तर – कळस, धानोरी व लोहगाव गावांची हद्द
पूर्व – मांजरी बु, शेवाळेवाडी, फुरसुंगी गावांची हद्द
दक्षिण पूर्व – उरुळी देवाची, होळकरवाडी, औतांडे हांडेवाडी गावांची हद्द
दक्षिणेस – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी गावांची हद्द
दक्षिण पश्चिमेस – नांदेड गाव, खडकवासला, नांदोशी, कोपरे गावांची हद्द
पश्चिमेस – कोंढवे-धावडे, बावधन बु, बावधन खुर्द, म्हाळुंगे, सूस गावांची हद्द
पश्चिम उत्तर – बाणेर, बालेवाडी गावांची हद्द