पुणे – शहरात श्वसन विकारास कारणीभूत ठरणाऱ्या पारव्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेकडून शहरात उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत महापालिकेने अशा जागा शोधण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले होते. त्यानुसार, शहरात २० ठिकाणी पारव्यांना खाण्यासाठी धान्य टाकण्यात येत असल्याचे समोर आले आहे. तर पारव्यांना खाण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी धान्य टाकू नये अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिलेला होता.
तरीही काही नागरिकांनी धान्य टाकणे सुरुच ठेवल्याने महापालिकेने तिघांवर कारवाई करून १ एक ७०० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रव्यांमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, त्यामुळे नागरिकांनी त्यांना खाद्यपदार्थ टाकू नये. असे आवाहनही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शहरात गेल्या काही वर्षात पारव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खुल्या जागांसह इमारतींमध्ये पारवे दिसून येतात.
पारव्यांच्या पिसांमुळे आणि विष्ठेतील जंतूमुळे हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया या आजार होत आहे. हा रोग फुफ्फुसाशी संबंधित आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारी देखील आलेल्या आहेत. त्यामुळे पारव्यांना नागरिकांनी खाद्यपदार्थ देऊ नयेत यासाठी पथके नेमण्यात आली असून या पथकाने नारायण पेठेत एका व्यक्तीला एक हजार रुपये, वारजेत ५०० रुपये आणि सारसबाग येथे २०० रुपयांचा दंड करून १ हजार ७०० रुपये वसूल केले आहे.