अंजली खमितकर
पुणे – महापालिकेच्या करोना स्पेशल रुग्णालयांमधील ऑक्सिजन गळतीवर मॉनिटरींग सुरू असून, रोज होणाऱ्या सुमारे दीड ते दोन टन ऑक्सिजन गळतीवर लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. किमान 40 ते 50 रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजन त्यातून वाचू शकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यावर पालिकेने मॉनिटरिंग सुरू केले आहे.
सध्या ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुडवडा, खासगी रुग्णालयांचे हाल, ऑक्सिजनशिवाय महापालिकेचे बंद असलेले बेड आणि रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजन बेडची निकडीची गरज या सगळ्याच विषयाच्या पार्श्वभूमीवर सध्या “प्राणवायू’ अर्थात ऑक्सिजन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचीच गळती होत असेल तर ही गोष्ट गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याने प्रशासनाने याचे मॉनिटरिंग सुरू केले आहे.
जम्बो सेंटर, महापालिकेची अन्य रुग्णालये यामध्ये ऑक्सिजन बेडवर असलेला रुग्ण, जो हिंडू-फिरू शकतो, स्वत: उठून टॉयलेटला जाऊ शकतो, उठून जेवू शकतो यावेळी त्याला लावलेला ऑक्सिजन मास्क तो काढून ठेवतो. परंतु केवळ मास्क काढून ठेवला जातो, त्यातील ऑक्सिजनचा पुरवठा त्या बेडपुरता बंद केला जात नाही. त्यामुळे त्या मास्कमधून ऑक्सिजन तसाच सुरू राहिल्याने तो वाया जातो. एकप्रकारे त्याची गळतीच होते. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आता अतिरिक्त आयुक्त
डॉ. कुणाल खेमनार यांनी सुरू केला आहे.
त्यांनी गुरूवारी दोन रुग्णालयांना भेट दिली आणि तेथे त्यांना या गोष्टी जाणवल्या. गेल्या दोन दिवसांपासून जम्बो रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई आहे. त्यामुळे तेथेही “बेडसाइड मॉनिटरिंग’ला सुरूवात केली आहे. दोन-तीन रुग्णांमागे एका व्यक्तीला किंवा नर्सला उभे करून हे “मॉनिटरिंग’ करण्यात येत आहे.
उपाय काय?
वस्तुत: ऑक्सिजन बंद करणे, सुरू करणे या गोष्टींची माहिती रुग्णाला दाखल होतानाच देणे आवश्यक आहे. जेणेकरून तो टॉयलेटला जाणे किंवा जेवत असेल तर ऑक्सिजनचा “नॉब’ त्या वेळेपुरता बंद करू शकेल. किंवा तेथे अशी माहिती देणारा बोर्ड, बेल लावता येईल का याचा विचार सुरू असल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.
बाणेर येथे झाली बचत
बाणेर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये अशाच प्रकारचे मॉनिटरिंग करून 24-25 टन लागणारा ऑक्सिजन आता 20 टनावर आणण्यात आला आहे. केवळ मॉनिटरींग करून हे शक्य झाले आहे. हाच प्रकार आता अन्य रुग्णालयातही अवलंबणार असल्याचे डॉ. खेमनार यांनी नमूद केले.
पिंपरी-चिंचवडसह अन्य रुग्णालयांतही हा फंडा
पुणे महापलिकेला गुरूवारी सुमारे 42 टन ऑक्सिजन मिळाला. परंतु जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचे वितरण करताना विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची अक्षरश: तारेवरची कसरत होत आहे. आहे त्या साठ्यात कोणाला ऑक्सिजन कमी पडू नये आणि रुग्णांचे हाल देखील होऊ नयेत अशी ती तारेवरची कसत आहे. त्यामुळे हा पुण्यातील “ऑक्सिजन मॉनिटरिंग’चा फंडा पिंपरी-चिंचवड आणि अन्य रुग्णालयांमध्ये वापरण्याचा विचार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.