पुणे – पी.एचडी.चे 2 हजार प्रवेश रिक्‍त

एम.फिल.च्या 180 जागा : जूनमध्ये प्रवेश परीक्षा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एम.फिल. आणि पीएच.डी.च्या रिक्‍त जागेचा तपशील शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार एम.फिल.च्या 180, तर पी.एचडी.च्या 2 हजार 160 प्रवेश रिक्‍त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आता जूनमध्ये पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षा घेण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने कोणत्या विभागात आणि कोणत्या मार्गदर्शकांकडे आरक्षणनिहाय रिक्‍त जागांची माहिती प्रसिद्ध केली. त्यानुसार विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी असलेल्या मार्गदर्शकांनुसार अर्ज करणे शक्‍य करणे होणार आहे. रिक्‍त जागेवरून व आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना आता एम.फिल. व पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.

विद्यापीठामध्ये थेट सहायक प्राध्यापक म्हणून रुजू व्हायचे असल्यास नेट परीक्षेसोबतच पी.एचडी.ची पदवी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अनिवार्य केली आहे. महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी नेट किंवा पीएच.डी. पदवी, अशी किमान पात्रता आहे. त्यामुळे राज्यातील असंख्य पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, तासिका तत्वावर काम करणारे सहायक प्राध्यापक आणि विद्यापीठ व महाविद्यालयांत अध्यापन करण्यासाठी इच्छुक असणारे पदव्युत्तरधारक नव्या पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच पी.एचडी.ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.

दरम्यान, विद्यापीठाने मार्गदर्शकंकडून त्यांच्याकडे असणाऱ्या रिक्‍त जागांची माहिती मागविली होती. मात्र, मार्गदर्शकांकडून वेळेत ही माहिती प्राप्त होत नव्हती. वारंवार माहिती भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी लागली. अखेर 20 मार्चपर्यंत एम.फिल. व पीएच.डी.ची रिक्‍त जागांची माहितीची प्रक्रिया पूर्ण झाली.

“पेट’साठी प्रक्रिया दहा दिवसांत सुरू होणार
एम.फिल. व पी.एचडी. प्रवेशपूर्व अर्थात “पेट’ परीक्षेसाठी येत्या दहा दिवसांत प्रवेशप्रक्रियेची परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येईल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक अर्हता आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा होणार असून, ही परीक्षा जूनमध्ये होणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखतीतून प्रवेशासाठी पात्र असणाऱ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.