पुणे – 1 रुपया भाड्याने मेट्रोला 17 जागा

मेट्रोकडून होती मागणी : प्रस्तावाला पालिका शहर सुधारणा समितीत मंजुरी

पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पासाठी “महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (महामेट्रो) यांना पुणे महापालिकेच्या 3 हजार 14 चौरस मीटर जागा विना-निविदा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याला शहर सुधारणा समितीने सोमवारी मंजुरी दिली. त्यात कोथरूड, शिवाजीनगर, सबर्बन, पुणे स्टेशन येथील उद्यानमधील एकूण 17 जागांचा समावेश आहे.

शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहरात मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी “महामेट्रो’ या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीकडे सोपवण्याला मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने शहरात संबंधित कंपनीतर्फे मेट्रो उभारणीचे काम सुरू केले आहे.
मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या पहिल्या टप्प्यासाठी आवश्‍यक जागा पुणे मेट्रो प्रकल्पासाठी उपलब्ध करून मिळणेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यात कोथरूड, शिवाजीनगर, सबर्बन, पुणे स्टेशन येथील उद्यानमधील जागांची मागणी आहे. मेट्रो स्टेशनचे एन्ट्री-एक्‍झिट, लिफ्ट, फुट ओवर ब्रीज वापराकरिता कायमस्वरूपी उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.

मेट्रोच्या कामाची तातडी आणि उपयुक्तता विचारात घेता महापालिकेच्या मालकीच्या जागा “महामेट्रो’ला त्वरीत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महापालिकेच्या मालकीची जागा किमान चालू बाजारभावाने भाडेपट्टा अथवा विक्री करून देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. मिळकत वाटप नियमावली वगळता कोणत्याही मिळकतीचा विनियोग जाहीर निविदा मागवून करण्यात यावा, असे नमूद आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. त्यानुसार “महामेट्रो’ने महापालिकेच्या मालकीच्या पहिल्या टप्प्यातील एकूण 17 जागा मागितल्या आहेत. आनंदनगर, कोथरूड उद्यान, पुलाची वाडी, सी.टी.एस, संभाजी उद्यान, शिवाजीनगर, महापालिका भवन, एलबीटी विभाग, ममता हॉटेलची जागा, बंडगार्डन, बालगंधर्व रंगमंदिर आदींचा समावेश आहे.

महापालिकेच्या स्वामित्त्वापोटी दरवर्षी 1 रुपये या नाममात्र दर प्रमाणे 30 वर्षे कालावधीसाठी महामेट्रोस हस्तांतरित करणेत यावेत, असे या प्रस्तावात नमूद केले आहे.

सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी
जागा उपलब्ध करून दिल्यानंतर त्यालगत असणाऱ्या परिसराची देखभाल आणि संरक्षण-सुरक्षितता याची जबाबदारी मेट्रोने पार पाडावी. वर्किंग स्पेस म्हणून देण्यात आलेल्या जागा काम झाल्यानंतर पूर्व स्थितीत करून देणे महामेट्रोवर बंधनकारक आहे. उद्यानात येणाऱ्या नागरिकांना तसेच सेवकांना कोणताही त्रास होणार नाही. तसेच त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी महामेट्रो यांनी घेणे आवश्‍यक आहे. महामेट्रोने केलेल्या बांधकामाच्या देखभाल दुरुस्ती सर्व जबाबदारी महामेट्रोकडे राहील, असे मेंगडे यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)