बाजारभावापेक्षा दुप्पट दराने खरेदी : चौकशीची मागणी
पुणे – लष्कर परिसरातील पाण्याची समस्या बिकट असतानाच, आता बोर्डातर्फे आठही वॉर्डात नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करून देण्यासाठी बसविलेल्या वॉटर एटीएमच्या खरेदीत घोटाळा झाला असल्याचा आरोप केला जात आहे. या वॉटर एटीएमच्या खरेदीसाठी बाजारभावापेक्षा तब्बल दोन लाख रुपयांनी अधिक रक्कम खर्च करण्यात आली असून या खरेदीत तब्बल 16 लाखांचा गैरव्यवहार झाला असल्याचा दावा करत, या खरेदीची चौकशी व्हावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय कवडे यांनी केली आहे.
नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने 2017 मध्ये एका खासगी कंपनीकडून आठ वॉटर एटीएमची खरेदी केली. बोर्डाच्या हद्दीतील आठ वॉर्ड आणि मुख्य प्रशासकीय इमारतीत हे वॉटर एटीएम बसविण्यात आले. या वॉटर एटीएमच्या माध्यमातून एका रुपयात एक लीटर पाणी उपलब्ध करून देण्याची बोर्डाची योजना होती. परंतु, हे एटीएम वेळोवेळी बंद असल्याचे निदर्शनास येत होते. त्या पार्श्वभूमीवर संजय कवडे यांनी बोर्डाकडे माहिती अधिकारात वॉटर एटीएमसंदर्भातील तपशील मागविला होता. त्यावर वॉटर एटीएमसाठी प्रत्येकी 4 लाख 33 हजार रुपये खर्च आला असून त्यातून बोर्डाला कोणताही आर्थिक फायदा होत नाही, असे बोर्ड प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, शहर व परिसरात एका रुपयात एक लीटर पाणी उपलब्ध करून देणारे वॉटर एटीएमची प्रत्यक्षात किंमत दोन लाख रुपये आहे. तरीही बोर्ड प्रशासनाने एका वॉटर एटीएमच्या खरेदीसाठी सव्वाचार लाख रुपयांहून अधिक किंमत मोजली आहे. त्यामुळे याप्रकरणी सुमारे 16 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा दावा संजय कवडे यांनी केला असून या संपूर्ण खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
इतकेच नव्हे तर या वॉटर एटीएमच्या “वॉरंटी’ आणि “गॅरंटी’ संदर्भात कोणतीही माहिती प्रत उपलब्ध नाही. तसेच, या वॉटर एटीएमचे संचालन सौर ऊर्जेवर होणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रत्येक एटीएमला एक हजार रुपये वीजबिल येत असल्याचेही माहिती अधिकारात उघड झाले आहे.