पुणे : रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विभागाकडून गेल्या दहा महिन्यांत राबविलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत २ लाख ९३ हजार ८०६ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून १५ कोटी ८६ लाख ६९ हजार ४५० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर आणि गाडीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांना तिकीट तपासणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये आरक्षित स्लीपर बोगीतून बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या तब्बल ५४ हजार प्रवाशांकडून कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर प्रवासादरम्यान क्षमतेहून अधिक साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून २ लाख ४९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
कारवाईचा धसका
विनातिकीट प्रवाशांबाबत रेल्वे प्रशासनाने विशेष मोहीम राबवून कारवाई केल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा संख्या घटली आहे. रेल्वेतून फुकट प्रवास करण्याचे प्रमाण उत्तरेकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये जास्त आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून गोरखपूर, दानापूर, इंदूर, झेलम या गाड्यांमध्ये वारंवार तिकीट तपासनिसांची संख्या वाढविण्यात येते. तरीही या गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबविले जाते. त्यामुळे प्रवाशांनी तिकिटासह प्रवास करावा; अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल. दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.
– डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक
या प्रकारच्या प्रवाशांवर बडगा
विनातिकीट – २,३४,८०६
बेकायदेशीर – ५४,०८९
सामान बुक न करता जाणारे – ४४१२
एकूण कारवाई – २,९३,३०७