पुणे – अल्पवयीन गुन्हेगार यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘परिवर्तन’ उपक्रम मागील एक वर्ष पासून राबविण्यात येत असून त्याचा परिणाम आता जाणवत आहे. पुणे शहरातील गुन्हेगारीत अडकलेल्या मुलांना पाच पोलीस स्टेशनच्या माध्यमातून बालस्नेही कक्षात स्वयंसेवी संस्थेद्वारे समुपदेशन करण्यात येत आहे. याद्वारे तब्बल दीडशे अल्पवयीन गुन्हेगार मुख्य प्रवाहात येण्यास तयार झाले आहेत.
किरकोळ कारणातून होणारी भांडण, घराच्या आजूबाजूचा परिणाम, आई-वडिलांचे लक्ष्य नाही, बेरोजगारी, शिक्षण कमी, वाईट संगत यामुळे मुले गुन्हेगारीत अडकत आहेत. योग्यवेळी त्यांना गुन्हेगारीतून बाहेर काढल्यास ते चूक सुधारून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतात, असे मत सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी व्यक्त केले.
शर्मा म्हणाले, “या मुलांना विविध वस्तू कौशल्य बनवणे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानुसार या मुलांनी वेगवेगळ्या कलाकुसरीचे वस्तू तयार केल्या आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढलेली दिसून येते, त्यात बालगुन्हेगार प्रमाण अधिक आहेत. त्यामुळे याबाबत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. या मुलांना समुपदेशन केल्यास त्यांचे मतपरिवर्तन होऊन ते मुख्य प्रवाहात येऊ शकतात. तब्बल दीडशेपेक्षा अधिक मुलांना गुन्हेगारीपासून बाहेर पडायचे असल्याने त्यांना सहकार्य करण्यात आले आहे. या मुलांना रोजगार देण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहे.
अल्पवयीनांचा टक्का जास्तच
अल्पवयीन गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न पोलीस करत असले, तरीही गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचे प्रमाण मोठे आहे. दोन दिवसांपूर्वीच पाच अल्पवयीन मुलांनी वानवडी येथे एका सराईत गुन्हेगाराचा खून केला. तर इतरही हाणामारी आणि दहशत पसरवण्याच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग नेहमी दिसून येत आहे.