पुणे- किडनी रॅकेट प्रकरणी अखेर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रुबी हॉल क्लिनिकमधील डॉ.परवेज ग्रॅंट यांच्यासह रुग्ण, दाता आणि प्रत्यारोन करणारे डॉक्टर, कायदेशीर सल्लागार, दलल आणि प्रत्यारोपन समन्वयक यांचा समावेश आहे.
रुग्ण अमित अण्णासाहेब साळुंके, सुजाता अमित साळुंखे, दाता सारीका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंके, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड, अभिजित मदने, डॉ.परवेज ग्रॅंट, रेबेका जॉन (उप संचालक, रुबी हॉल), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉ.अभय सद्रे, डॉ.भुपत भाटी,डॉ.हिमेश गांधी, समन्वयक सुरेखा जोशी अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ.संजोग सिताराम कदम यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार यातील सारीका सुतार हिला पैशाची गरज असल्याने तीने अमित साळुंखे यांना किडनी देण्याचे कबुल केले. यासाठी अमित आणि सुजाता यांनी तीला 15 लाख रुपये देण्याचा व्यवहार केला. सारिका हिने 24/ 3/2022 रोजी रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी गेली. मात्र आरोपींनी सारिकाला 15 लाख रुपये न देता तीची फसवणूक केली. या प्रत्यारोपणासाठी ऑगस्ट 2021 ते 29/3/2022 दरम्यान साळुंखे दांम्पत्यांनी दलाल रवी गायकवाड आणि अभिजीत मदने यांच्या मदतीने कट रचला. त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन रुबी हॉल येथे सादर केली. तर इतर आरोपींनी कागदपत्रांची खात्री न करता सदरिल कागदपत्रे रिजनल ऍथोरायजेशन कमिटीकडे(ससून) पाठवून दिशाभूल केली. त्यांनी मानवी अवयव प्रत्यारोपन कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शणास आले आहे. प्रत्यारोपनाचा गैरप्रकार रुबी हॉल क्लिनिक येथे घडला असून रुबी हॉलचे मॅनेजींग ट्रस्टी या नात्याने डॉ. परवेज ग्रॅंट तीतकेच जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वेताळ करत आहेत.