पुणे – 146 लिटर भेसळयुक्त निरा जप्त

एफडीएची कारवाई : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

पुणे – उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अंगाची लाही लाही कमी करण्यासाठी नागरिकांकडून नीरा, लिंबू सरबत, कोकम या थंड पेयांना अधिक मागणी आहे. परंतु, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जुन्या जिल्हा परिषदेजवळील नीरा सोसायटी विक्री केंद्रावर टाकलेल्या छाप्यात निरेमध्ये पाण्यासह बर्फ मिसळला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एफडीएने 7 हजार 300 रुपये किमतीची 146 लिटर निरा जप्त केली आहे.

जुन्या जिल्हा परिषदेजवळ नीरा सहकारी विक्री सोसायटी आहे. या सोसायटी केंद्रातून शहरातील अन्य नीरा केंद्रांवर ती पाठविली जाते. त्यामध्ये साधारण 345 केंद्रे आहेत. आरोग्यासाठी निरा पौष्टीक असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याला अधिक मागणी असते. परंतु, विक्रेत्यांकडून खरच पौष्टीक निरा विक्री केली जाते का? त्यामध्ये बर्फ आणि पाणी मिसळले तर जात नाही ना? याबाबतची पाहणी करण्यासाठी “एफडीए’चे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संपत देशमुख, संजय नारागुडे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी, खेमा सोनकांबळे यांनी मुख्य केंद्रावरच छापा टाकला.

यावेळी सोसायटीकडे एफडीएचा परवाना नव्हता, तसेच नीरेची तपासणी केली असता त्यामध्ये बर्फ आणि पाणी मिसळल्याचे आढळले. तसेच, अस्वच्छता दिसून आल्याची माहिती “एफडीए’ प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, नीरा सोसायटीकडून शहरातील नीरा विक्री केंद्राची यादी घेण्यात आली असून, त्यांच्याकडे परवाना नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात ताडीची तीन ते चार हजार झाडे असल्याची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंद आहे. या झाडांपासून जी नीरा मिळते ती सर्वप्रथम या केंद्रामध्ये येत असते. तेथून ती शहर आणि जिल्ह्यातील केंद्रांना वितरीत होत असते, अशी माहिती एफडीएच्या वतीने देण्यात आली.

नीरेमध्ये होतेय भेसळ
उन्हाळ्यात नीरेला नागरिकांकडून अधिक मागणी असते. परंतु, विक्रेत्यांकडून निरेचा तुटवडा होऊ नये यासाठी त्यामध्ये बर्फ आणि पाणी मिसळले जाते. तसेच, त्यामध्ये तुरटपणा येण्यासाठी प्रामुख्याने चुन्याची निवळी मिसळली जाते; तर पांढरपणा येण्यासाठी भिजलेल्या तांदळाचे पाणी मिसळले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे निरा पिताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

कोकममध्ये रंग मिसळतात
उन्हाळ्यामध्ये निरेसह कोकमलाही अधिक मागणी असते. कोकम या फळापासून तयार करण्यात आलेले कोकम शरिरासाठी चांगले, त्याचा त्रास होत नाही. परंतु, विक्रेत्यांकडून लाल रंग टाकून कोकम तयार केला जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोकम पितानाही नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

लिंबू सरबतामध्ये दुषीत बर्फतर नाही ना?
उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबतामुळे शरिराला उर्जा मिळते. त्यामुळे रस्त्याने जाताना वाहनचालक निरा विक्री केंद्रावर किंवा थंड पेय विकणाऱ्या एखाद्या स्टॉलवर थांबून लिंबू सरबत आणि कैरीचे पन्हे पिताना दिसतात. मात्र, या लिंबू सरबतासाठी बहुतांश विक्रेते अशुध्द पाणी आणि बर्फ वापरत असल्याचे दिसून येते. उन्हाने तापलेली डोकी शांत करण्यासाठी नागरिक अधिक बर्फ टाका अशी मागणी करतात. मात्र, हा बर्फ आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे बर्फ आणि पाण्याची शुध्दता पाहूनच थंड पेय प्यावे.

एफडीएने नीरा सोसायटीत छापा टाकल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्याठिकाणी नीरा साठवून ठेवली आहे, ती जागा अतिशय अस्वच्छ आहे. तसेच त्यामध्ये बर्फही ठेवण्यात आला होता. येथे बर्फामध्ये भेसळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही नीरा नष्ट केली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यापुढील कालावधीतही छापासत्र सुरूच राहाणार आहे.
– सुरेश देशमुख, सह आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.