पुणे – बारावीचे परीक्षार्थी वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत

पुणे  – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेबाबतही अनिश्‍चितता निर्माण झालेली आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यास मुहूर्तच सापडत नसल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमात पडले आहेत.

दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येते. यंदा करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा एप्रिल-मे मध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत या परीक्षा घेण्याचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा हे वेळापत्रक रद्द करण्यात आले. आता मेअखेरीस या परीक्षा होतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.
बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. देशभरातील करोनाच्या संकटामुळे “जेईई’, “नीट’यासारख्या प्रवेश परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत.
दरम्यान, बऱ्याचशा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियेत बारावीचे गुण व प्रवेश परीक्षेचे गुण दोन्ही महत्वाचे असतात. त्यामुळे बारावीच्या परीक्षा या कोणत्याही परिस्थितीत झाल्याच पाहिजेत, असा आग्रह धरण्यात येत आहे.

बारावीच्या परीक्षा होणार की नाही, परीक्षा होणार असतील तर त्या कधी होणार, वेळापत्रक कधी जाहीर होणार असे अनेक प्रश्‍न विद्यार्थी, पालक यांच्याकडून उपस्थित करण्यात येऊ लागले आहेत.

इतर विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या जून- जुलैमध्ये होण्याची शक्‍यता असल्याने त्या पूर्वी बारावीच्या परीक्षा होणे गरजेचे आहे. करोनाच्या काळात विविध संकटाचा सामना करत विद्यार्थी अभ्यास करत आहेत. परीक्षेबाबत तळ्यात-मळ्यात अशी परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांच्या टेन्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

निर्णयाचे अधिकार नाहीत?
दरम्यान, या परिस्थितीबाबत बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले, की परीक्षांचे वेळापत्रक जरी बोर्ड प्रशासन ठरवत असले, तरी निर्णयाचे अधिकार मात्र मुंबईत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बोर्ड फक्‍त “बोलके बाहुले’ आहे का, असा प्रश्‍न सद्यस्थितीवरून निर्माण होत आहे.

अधिकाऱ्यांचे बैठकांचे सत्र सुरूच
शालेय शिक्षण विभाग, राज्य मंडळ यांचे बैठकांचे सत्र सुरूच आहे. कोणताही निर्णय घेण्याबाबत व ते जाहीर करण्याबाबत अधिकाऱ्यांना फारसे स्वातंत्र्य राहिलेले नाही. बारावीच्या परीक्षेसाठी सुधारित वेळापत्रक तयार करण्याचे कामकाज सुरू असून ते पूर्ण झाल्यावर वेळापत्रक जाहीर करू, असे राज्य मंडळाकडून सतत हेच सांगण्यात येत असते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.