पुणे : बॅंकांधील महापालिकेच्या ठेवींचा आकडा 2200 कोटींच्या वर गेला असून, पुढील वर्षात त्यात आणखी भर पडणार आहे. या ठेवींवर पुढील आर्थिक वर्षात 110 कोटींचे व्याज प्रशासनाला अपेक्षित आहे. दरम्यान, करोना संकटामुळे बॅंकांनी मुदत ठेवींवरील व्याज दर कमी केल्याने महापालिकेस गेली दोन वर्षे सातत्याने ठेवींवर अवघे 40 ते 45 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून पुन्हा बॅंका महापालिकेच्या ठेवींवर साडेसहा ते सात टक्क्यांपर्यंत व्याजदर देऊ लागल्याने ठेवींवरील व्याजाचे उत्पन्न वाढणार असल्याचा अंदाज पालिकेच्या 2023-24 च्या अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत महापालिकेच्या बॅंकांमधील ठेवी जवळ्पास 1 हजार कोटींनी वाढल्या आहेत. 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षात शहरात करोना संकट होते. या कालावधीत महापालिकेने अनेक अनावश्यक खर्चांना कात्री लावत केवळ आरोग्य व्यवस्थेवर खर्च केला. तर करोना संकटातही राज्यात सर्वाधिक मिळकतकर पुणे महापालिकेने वसूल केला होता. त्यामुळे पालिकेचा खर्च कमी झाल्याने ठेवींची संख्या काही प्रमाणात वाढल्या. तर 2021-22 या आर्थिक वर्षात करोना संकट संपलेच शिवाय, महापालिकेस तब्बल 6 हजार कोटींचा महसूल मिळाला, या वर्षातही पालिकेने वित्तीय समितीच्या माध्यमातून अनेक खर्चाला मर्यादा घातली होती. त्यानंतर लगेच 2022-23 मध्ये महापालिकेवर प्रशासक नियुक्ती झाल्यानंतर शहरातील नगरसेवकांच्या भांडवली कामांना कात्री लागली, परिणामी, महापालिकेने गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाचलेल्या निधीची गुंतवणूक केली आहे.
मात्र, त्याच वेळी करोना काळात दोन वर्षांत बॅंकाचे व्याजदर 4 टक्क्यांवर आल्याने पालिकेस ठेवी वाढूनही व्याजाचे उत्पन्न 40 कोटींच्यावर गेले नाही. तर त्याच वेळी गेल्या सहा महिन्यांत बॅंकांकडून पुन्हा महापालिकेस नव्याने केलेल्या गुंतवणूकीवर 6.5 ते 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळू लागला आहे. तर 2022-23 मध्येही पालिकेसही जवळपास 7 हजार कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा असल्याने त्यातूनही ठेवी वाढतील. या ठेवीतून 110 कोटींचे व्याज मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
करोना संकटाच्या काळात महापालिकेच्या ठेवींवर अपेक्षित व्याज मिळत नव्हते. त्यावेळी पालिकेस सलग दोन वर्षे ठेवींवर केवळ 40 ते 45 कोटीच व्याज मिळाले. मात्र, गेल्या सहा महिन्यांत व्याजदर पुन्हा वाढल्याने तसेच पुढील वर्षातही काही प्रमाणात गुंतवणूक वाढणार असल्याने 110 कोटींचा महसूल ठेवींवर मिळण्याची अपेक्षा आहे.
– उल्का कळसकर, उपायुक्त आणि मुख्य लेखापाल, पुणे महापालिका