पुणे – आरटीओकडून 107 प्रचार वाहनांना “ना हरकत’

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या 107 वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) “ना हरकत प्रमाणपत्र’ दिले आहे. याचबरोबर “डिजिटल डिस्प्ले बोर्ड’ असणाऱ्या 10 ते 15 वाहनांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 114 अर्ज प्राप्त झाले होते. कार्यालयाने 107 वाहनांना “ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात आले असून 7 वाहनांचे अर्ज प्रलंबित आहेत. कागदपत्रे पूर्ण नसल्याने हे अर्ज प्रलंबित होते, असे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या प्रचारानेही वेग घेतला आहे. प्रचारासाठी उमेदवार रिक्षा, कार, ट्रक आदी वाहनांचा उपयोग करतात. परंतु, ही वाहने वापरण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून परवानगी घेणे गरजेचे असते. वाहनाची कागदपत्रे, चालकाचा परवाना आदी गोष्टींची पूर्तता या परवानगीसाठी करणे आवश्‍यक असते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या “एक खिडकी’ योजनेअंतर्गत या वाहनांना पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड, बारामती या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून “ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात येते, असे कार्यालयाकडून नमूद करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)