पुणे : 10 हजार भटक्‍या कुत्र्यांना देणार “रेबिज” लस

पुणे – “वर्ल्ड रेबिज डे’ (दि. 28 सप्टेंबर) निमित्त संपूर्ण शहरातील भटक्‍या कुत्र्यांना “रेबिज’ लस दिली जाणार आहे. तब्बल 15 दिवस ही मोहीम शहरात सुरू राहणार आहे.या मोहिमेदरम्यान सुमारे 10 हजार भटक्‍या कुत्र्यांना ही लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पुणे शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न कायमच ऐरणीवर असतो. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या आलेखाप्रमाणे तीन टक्के संख्या ही श्‍वानांची आहे. या आराखड्यानुसार शहरात किमान दीड लाख श्‍वान असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातील पशुशल्यचिकित्सा अधिकारी डॉ. सारिका पुंडे यांनी सांगितले.

भटक्‍या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करणे, त्यांना लस देणे यासाठी शहरातील पाच झोनमध्ये मिळून पाच गाड्या आहेत. याशिवाय “कॅनीन कंट्रोल केअर’ या स्वयंसेवी संस्थेच्या तीन गाड्या आहेत. ही संस्था “ना नफा ना तोटा’ तत्त्वावर कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरणाचे काम करते. त्याचबरोबर “युनिव्हर्सल’ आणि “जेनिस’ या दोन संस्थांनाही या कामाचे आदेश दिले आहेत. परंतु, अद्याप त्यांचे काम सुरू झाले नसल्याचे, डॉ. पुंडे यांनी सांगितले.

पुणे शहरात गेल्यावर्षी एप्रिल ते यावर्षी मार्च या 12 महिन्यांत 14 हजार 136 भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया महापालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच, या कुत्र्यांचे लसीकरण देखील करण्यात आले आहे. करोना, मनुष्यबळाचा अभाव, कुत्रे पकडणाऱ्या संस्थांची अनास्था यामुळे श्‍वानांच्या नसबंदी शस्त्रक्रिया धिम्यागतीने सुरू आहे, त्यामुळे करोना काळात रस्त्यावर सहसा सापडू शकणाऱ्या या कुत्र्यांची ही मोहीम होऊ शकली नाही.

करोना काळात महापालिकेच्या अनेक विभागांमधील मनुष्यबळ करोना उपाययोजनांसाठी वापरला गेला आहे. त्यात या पशुवैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. त्यामुळे या दीड वर्षाच्या काळात कुत्र्याची नसबंदी आणि लसीकरण झाले नाही. मात्र, आता “वर्ल्ड रेबीज डे’ निमित्त जी मोहीम राबवली आहे त्याला जास्तीतजास्त सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन डॉ. पुंडे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.