पुणे – धायरीसाठी दररोज 100 टॅंकरफेऱ्या

आंदोलन आणि टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाला जाग

पुणे – धायरी गावातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने मंगळवारी तातडीने खडकवासला कालव्याच्या बाजूला टॅंकर पॉइंट उभारण्याचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात एक पॉइंट उभारून दिवसाला 100 टॅंकर फेऱ्या करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या भागातील नागरिकांनी सोमवारी हंडा मोर्चा काढत पाणी देण्याची मागणी केली. याचे पडसाद मुख्यसभेतही उमटले. त्यानंतर प्रशासन जागे झाले आहे.

धायरी परिसर महापालिकेत असतानाही गेल्या काही दिवसांपासून या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तर टॅंकर चालकांकडूनही मनमानी पद्धतीने पैसे आकारून नागरिकांची लूट केली जात आहे. त्यातच उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांना आता पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त असून प्रशासनाने तातडीने पाण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी केली आहे. हे गाव महापालिकेत असूनही प्रशासनाला पाणी देता येत नसल्याचे सांगत या टंचाईचे खापर फोडण्यात आले. त्यानंतर महापौरांनीही तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत होण्यास काही वेळ जाणार असल्याने प्रशासनाने या गावासाठी तात्पुरता टॅंकर पॉइंट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. धायरी फाटा येथे कॅनॉलच्या बाजूला महापालिकेचा नऱ्हे गावाला पाणी पुरवठा करणारा बुस्टर पंप असून या पंपाजवळ हा पॉइंट उभारण्यात येत आहे. तूर्तास एकच पॉइंट असला, तरी भविष्यात याची संख्या वाढविली जाणार असून सध्या दिवसाला किमान 100 फेऱ्या होतील, अशा पद्धतीने नियोजन सुरू असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.