Pune : फुस लावून पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे – लग्नाच्या अमिषान फुस लावून पळवून नेवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी सुनावली. दंड न भरल्यास 1 वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

दत्ता अलिंगन ढावरे (वय 19, रा. रामटेकडी, हडपसर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 15 वर्षीय पीडितेच्या आईने याबाबत वानवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी कॉन्स्टेबल पी.पी.पवार, ए.एस.गायकवाड, उपनिरीक्षक पांडे यांनी मदत केली.

14 एप्रिल 2017 रोजी सकाळी पीडित ट्युशनला जाते म्हणून, घरातून निघून गेली. ती परत आलीच नाही. त्यामुळे घरच्यांनी ती हरविल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती परत आली. त्यावेळी चौकशी केली असता, ढावरे याने सारसबाग फिरविण्याचा बहाणा करून तिला घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर विश्‍वासात घेऊन चौकशी करण्यात आली.

त्यावेळी तीन-चार महिन्यापूर्वी स्वत:च्या घरात त्याने लग्नाच्या अमिषाने तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तीवाद करताना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील लीना पाठक यांनी केली.

त्यानुसार न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार कायदा कलम सहा आणि भादवी कलम 376 (बलात्कार) नुसार 10 वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंड, 363 (पळवून नेणे) नुसार 1 वर्ष सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.