Pune | १ हजार २६५ शासकीय वाहने ३१ डिसेंबरपर्यंत स्क्रॅप होणार

पुणे – शहर आणि जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील १५ वर्षे पूर्ण झालेली शासकीय वाहने दरवर्षी स्क्रॅप केली जातात. यंदाही ३१ डिसेंबरपर्यंत १ हजार २६५ शासकीय वाहने स्क्रॅप होणार आहेत. ही प्रक्रिया सुलभ आणि जलदगतीने व्हावी यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.
जानेवारी २०२१ मध्ये सरकारी वाहनांसाठी व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी मंजूर करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीचे आणि १५ वर्षांपेक्षा जास्त वर्षांची वाहने स्क्रॅप केले जातील. त्यानुसार दरवर्षी १५ वर्षे पूर्ण झालेली शासकीय वाहने स्क्रॅप केली जातात. राज्यात मोठ्या संख्येने शासकीय वाहने स्क्रॅप होतात. त्यासाठी स्क्रॅप होणाऱ्या वाहनांची नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे.
संबंधित सरकारी विभागांनी त्या पोर्टलवर माहिती भरणे बंधनकारक आहे. त्यानुसार संबंधीत विभागाकडील वाहने स्क्रॅप केली जातात. पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात मिळून १ हजार २६५ शासकीय वाहनांचा समावेश आहे. या वाहनांना ३१ डिसेंबरपर्यंत स्क्रॅप करण्यात येणार आहे.
“१ हजार २६५ शासकीय वाहने स्क्रॅप होणार आहेत. त्यासाठी पुणे आरटीओ कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. तसेच ज्या विभागाकडे स्क्रॅप वाहनांची संख्या अधिक आहे, त्यांना एमएसटीसी पोर्टल लाॅगीन आयडी देण्यात येईल.” – स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.





