मिळणाऱ्या उत्पन्नातून 3 वर्षांत प्रकल्पाच्या 40 टक्के खर्चाचा परतावा
पुणे -“एचसीएमटीआर’ (शहरांतर्गत वर्तुळाकार रस्ता) प्रकल्प उभारणी खर्चासाठी मुद्रांक शुल्कावर 1 टक्का अधिभार लावण्यात येणार आहे. यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून 3 वर्षांत प्रकल्पाच्या 40 टक्के खर्चाचा परतावा करण्यात येणार आहे. “एचसीएमटीआर’ प्रकल्पासाठी एकूण 5 हजार 192 कोटी रुपये खर्च येणार आहे. याची निविदा शुक्रवारी उघडण्यात येणार आहे.
खासदार गिरीश बापट यांनी पुणे शहरातील विकास प्रकल्पांबाबत गुरुवारी बैठक घेतली. यावेळी “एचसीएमटीआर’ प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. महापालिका प्रशासनाने यावर्षी 215 कोटी रुपयांची अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली आहे. यामाध्यमातून प्रकल्पाचे प्राथमिक काम सुरू होणार आहे. मात्र, प्रत्येक वर्षाला 700 कोटींचा खर्च या प्रकल्पासाठी होणार असल्यामुळे महापालिकेला इतक्या मोठ्याप्रमाणात निधी उभारणे शक्य नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने “एचसीएमटीआर’ प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्कावर 1 टक्का अधिभार लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाची मान्यता आवश्यक आहे. याविषयी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी माहिती दिली.
निधी उभारण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रस्त्यावर टोल आकारण्याचा पर्याय, जाहिरात हक्क, टीओडी, व्यापारी संकुल बांधणे हे पर्यायही विचाराधीन आहेत. प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के रक्कम ही तीन वर्षांमध्ये द्यायची आहे. उर्वरित 60 टक्के खर्च पुढील पंधरा वर्षांमध्ये द्यायचा आहे. त्यामुळे 1 टक्का मुद्रांक शुल्क पुढील 18 वर्षे पुणेकरांना भरावे लागेल. “एचसीएमटीआर’ आणि मेट्रोच्या बाजूला टीओडी झोन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रीमियम एफएसआय शुल्कामधून प्रकल्पासाठी निधी मिळू शकतो, असे सत्ताधाऱ्यांना वाटते.
वाहतुकीचा ताण होणार कमी
शहरातील रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि भविष्यातील रहदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या “एचसीएमटीआर’ रस्त्याची लांबी एकूण 36.6 किमी आहे. हा रस्ता संपूर्ण इलेव्हेटेड असणार आहे. याची रुंदी 24 मीटरची असणार आहे. या मार्गावर 6 मार्गिका (लेन्स) असणार आहेत. त्यापैकी 2 बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. विशेषत: राष्ट्रीय महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार आहे. इलेव्हेटेड असणाऱ्या या मार्गावर बीआरटीसाठी 28 स्थानके असणार असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आणि यांत्रिक जिने (एलेव्हेटर्स) यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी 40 वर्षांत वाहतूक वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा 50 किमी प्रतितास एवढी निश्चित करण्यात आली आहे. सन 2040 पर्यंत वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन या रस्त्याचे नियोजन होणार आहे. या मार्गासाठी 72 हजार 346.816 चौरस मीटर क्षेत्र अधिग्रहित करण्यात आले आहे.