पुणे -‘आरटीई’ प्रवेशासाठी 1 लाख 81 हजार अर्ज

शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपणार

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार “आरटीई’च्या 25 टक्‍के प्रवेशासाठी राज्यातून 1 लाख 81 हजार अर्जांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. येत्या शुक्रवारी अर्ज करण्याची मुदत संपणार आहे.

राज्याच्या विविध जिल्ह्यांत “आरटीई’ प्रवेशासाठी 5 मार्चपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. एकूण 9 हजार 194 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 782 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पालकांकडून उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. पुण्यात 16 हजार 619 जागांसाठी सर्वाधिक 42 हजार 263 तर सिंधुदुर्गमध्ये 353 जागांसाठी सर्वात कमी 308 एवढे अर्ज दाखल झाले आहेत. आणखी दोन दिवसांत अर्ज दाखल होण्याच्या संख्येत वाढ होणार हे उघड आहे.

ऑनलाइन व मोबाइल ऍपद्वारे अर्ज नोंदणीसाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात ऑनलाइनद्वारे 1 लाख 81 हजार 167 तर मोबाइल ऍपद्वारे केवळ 465 अर्जांची नोंदणी झाली आहे. पालकांनी दाखल केलेल्या अर्जांची व कागदपत्रांची छाननीही अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. छाननीत पात्र ठरलेल्या अर्जांची 22 मार्चनंतर प्रवेशासाठी सोडत काढण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सोडतीत नंबर आलेल्यांना जूनपासून शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

जिल्हानिहाय दाखल अर्ज
अहमदनगर-3805, अकोला-4772, अमरावती-6135, औरंगाबाद-10384, भंडारा- 1889, बीड-3354, बुलढाणा-3696, चंद्रपूर-2917, धुळे-1558, गडचिरोली-714, गोंदीया-2008, हिंगोली-1188, जळगाव-5088, जालना-3478, कोल्हापूर-1514, लातूर-2718, मुंबई-9239, नागपूर-22038, नांदेड-6078, नंदुरबार-311, नाशिक-10395, उस्मानाबाद-1162, पालघर-918, परभणी-1673, पुणे-42263, रायगड – 4628, रत्नागिरी-581, सांगली-1136, सातारा-1594, सिंधुदुर्ग-308, सोलापूर-3441, ठाणे-12355, वर्धा-3324, वाशिम-1223, यवतमाळ-3758.

Leave A Reply

Your email address will not be published.