पुणे – दिवाळीत पुणे विभागातून सोडलेल्या नियमित आणि जादा बसमधून तब्बल १५ लाख जणांनी प्रवास केला. त्यामधून पुणे विभागाला जवळपास १८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. दरम्यान, भाऊबीजेच्या दिवशी (३ नोव्हेंबर) पुणे विभागातून १ लाख ५१ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून एसटीला दोन कोटी १० हजारांचे उत्पन्न मिळाले. दिवाळीच्या दहा दिवसांतील ही सर्वाधिक प्रवासी संख्या ठरली.
दिवाळीत पुणे एसटी विभागाकडून नियमित आणि खडकी येथील मैदानातून जादा बस सोडण्यात आल्या. यंदा ५५० जादा बस सोडण्याचे नियोजन केले होते. विभागातील १३ आगारांतून ८८० जादा बस सोडल्या होत्या. एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनांमुळे एसटीकडे प्रवासी मोठ्या संख्येने वळले आहेत. अजूनही पुढील आठ दिवस ही गर्दी कायम राहणार आहे.
भाडेवाढ रद्द केल्याने उत्पन्न घटले
एसटी महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीत १० टक्के भाडेवाढ करण्यात येते. यंदा राज्य सरकारने ही भाडेवाढ रद्द केली. यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला असला, तरी एसटीच्या पुणे विभागात उत्पन्नात ८ टक्के घट झाली आहे.