पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांमध्ये चांगला पाऊस झाल्याने मागील 24 तासांत प्रकल्पात 1.34 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. सद्यःस्थितीत खडकवासला प्रकल्पात एकूण 6.25 टीएमसी म्हणजे 21.44 टक्के पाणी उपलब्ध आहे.
पुणे शहराला खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला चार धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील 15 दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस समाधानकारक पडत आहे. धरण परिसरातही पावसाची संततधार सुरू असल्याने ओढे-नाले वाहत असून हे पाणी धरणात जमा होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मागील 24 तासांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आहे.
रविवारी दिवसभरात खडकवासला धरण परिसरात 9 मिमी, पानशेतमध्ये 30 मिमी, वरसगावमध्ये 31 मिमी आणि टेमघर धरणात 64 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात चांगल्या स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात 6.25 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी 6.39 टीएमसी इतका पाणीसाठा होता.