मुंबई: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पॉवर प्लेअरचा प्रयोग होणार नसल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात आले असून त्या जागी केवळ नो बॉल पाहण्यासाठी चौथ्या पंचाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
क्रिकेट सामन्यात मैदानावरचे दोन पंच तसेच तिसरा पंच नियुक्त केलेला असतो. आता एक अतिरिक्त चौथ पंच नियुक्त केला जाणार असून हा पंच गोलंदाजाने टाकलेला चेंडू योग्य आहे का नो बॉल आहे त्याचीच केवळ पाहणी करणार आहे.
तसेच गोलंदाजाने टाकलेला चेंडू नो बॉल असल्यास हा पंच त्वरित मैदानावरील पंचाला सूचना करेल.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) पॉवर प्लेअर ही संकल्पना सुरू करण्यापूर्वी सईद मुश्ताक अली स्पर्धेतही त्याचा प्रयोग होणार होता. मात्र, ते शक्य न झाल्यामुळे आयपीएलमध्ये सध्यातरी हा प्रयोग होणार नसल्याचे संकेत मंडळाने दिले.
ही संकल्पना राबविण्यासाठी आणखी वेळ जावा लागेल त्यानंतरच स्थानिक स्पर्धेत त्याचा प्रायोगिक पातळीवर अवलंब केल्यानंतर मंडळ याबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेईल, असेही मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.