पुनावळे कचरा डेपोचा प्रश्‍न चिघळणार

विरोध कायम : जागा ताब्यात घेण्याच्या महापालिकेच्या हालचाली

पिंपरी – राज्य सरकारच्या वन विभागाच्या ताब्यात असलेली पुनावळे येथील 22 हेक्‍टर जागा प्रस्तावित कचरा डेपोसाठी ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे यांच्या पत्राने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. तर कचरा डेपोला विरोध करणाऱ्यांनी हा कचरा डेपो कसा अनावश्‍यक आहे, हे पटवून देण्यासाठी आटापिटा चालविला आहे.

वाढत्या शहरीकरणाचा विचार करून घनकचरा व्यवस्थापनासाठी पुनावळे येथील वनविभागाची 61 एकर जागा मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. जागेपोटी आतापर्यंत टप्प्या-टप्प्याने 85 लाख रुपये महापालिकेने वनविभागाला दिले आहेत. मात्र, राज्य सरकारकडून या जागेचा ताबा महापालिकेकडे देण्याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे हा प्रश्‍न अद्यापही प्रलंबितच आहे. मात्र, अतिरिक्‍त आयुक्‍त गावडे यांनी ही जागा ताब्यात घेण्याबाबत प्रयत्न व्हावेत, अशा आशयाचे पत्र नगररचना विभागाला दिल्याने अनेक वर्षे मागे पडलेला हा प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखांवर पोचली आहे. शहरामध्ये सध्या दररोज 950 टन कचरा निर्माण होत आहे. सध्या महापालिकेकडून मोशी येथील यांत्रिकी खत निर्मिती प्रकल्पाद्वारे 450 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पात 30 टन कचऱ्यावर तर, प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती या प्रकल्पाद्वारे 5 टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. शहरात निर्माण होणाऱ्या घन कचऱ्यावर प्रक्रिया व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी फक्‍त मोशी कचरा डेपो आहे. मात्र, झपाट्याने वाढत असणाऱ्या शहरीकरणामुळे महापालिकेला आणखी जागेची गरज आहे.

राष्ट्रवादीचा कचरा डेपोला विरोध

राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी पुनावळे येथील कचरा डेपोला विरोध केला आहे. या परिसरातील लोकसंख्या वाढली आहे. हा कचरा डेपो सुरु झाल्यास या नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. तसेच प्रत्येक वॉर्डात निर्माण होणारा कचरा त्याच वॉर्डात जिरविण्याचा प्रयत्न करावा. मात्र, यानंतरही महापालिका प्रशासनाने पुनावळे कचरा डेपोसाठी जागा ताब्यात मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केल्यास त्याला आमचा विरोध असेल, असे महापालिका आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरूच

कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्‍न सुटणार आहे, अशी भूमिका महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी मांडली आहे. तर अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे यांनी त्यापूर्वीच ही जागा ताब्यात घेण्यासाठी नगररचना विभागाला पत्र दिल्याने प्रशासनाचे कचरा डेपोच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.