पुना क्‍लब संघाला विजेतेपद

एस. बालन करंडक आंतर क्‍लब अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धा : सनी इलेव्हन संघाचा 63 धावांनी पराभव

पुणे  – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि पुनित बालन एन्टरटेन्मेंट आणि स्टेडियम क्रिकेट क्‍लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एस. बालन करंडक आंतर क्‍लब अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुना क्‍लब संघाने सनी इलेव्हन संघाचा 63 धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

नेहरू स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये राजकमल चौहान याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुना क्‍लबने रोमहर्षक विजय मिळविला. पुना क्‍लबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 160 धावांचे आव्हान उभे केले. सलामीवीर यश नहार (47 धावा) आणि हृषीकेश मोटकर (28 धावा) या जोडीने 56 चेंडूत 81 धावांची भागीदारी करत पुना क्‍लबला निर्णायक सुरूवात करून दिली. पण मधल्या फळीतील फलंदाजांना याचा फायदा उठवता आला नाही. पुना क्‍लबने 160 धावा धावफलकावर लावल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना सनी इलेव्हनची सुरूवात खराब झाली. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. 45 धावांवर 4 गडी बाद असा त्यांचा संघ अडचणीत आला. राजकमल चौहान याने 31 धावांत 4 गडी, तर धनराज परदेशी याने 11 धावात 3 गडी बाद करून सनी इलेव्हनच्या फलंदाजीला खिंडार पाडले. या दोघांच्या गोलंदाजीला अचूक क्षेत्ररक्षणाची साथ मिळाल्याने सनी संघाचा डाव 17 षटकात 97 धावांवर आटोपला. सनी संघाकडून रोहन दामले याने सर्वाधिक 44 धावा केल्या. इतर कोणताही खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.

विजेत्या पुना क्‍लब संघाला करंडक आणि रोख 51 हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या सनी इलेव्हन संघाला रोख 31 हजार रूपये आणि करंडक देण्यात आला. याशिवाय स्पर्धेचा मानकरी हा किताब पिल्सनर्स सीसीच्या स्वप्निल कुलकर्णी (166 धावा आणि 8 विकेट) याला मिळाला. सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब हृषीकेश मोटकर (पुना क्‍लब आणि 391 धावा) याला तर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज शुभम कोठारी (सनी इलेव्हन आणि 11 विकेट) याला देण्यात आला.

स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा सविस्तर निकाल ः पुना क्‍लब ः 20 षटकांत 7 गडी बाद 160 धावा ः (यश नहार 47 (36, 8 चौकार), हृषीकेश मोटकर 28, दिपक डी. 24, शुभम कोठारी 4-11).

सनी इलेव्हन ः 17 षटकात सर्वबाद 97 धावा (रोहन दामले 44 (29, 2 चौकार, 2 षटकार), राजकमल चौहान 4-31, धनराज परदेशी 3-11); सामनावीर ः राजकमल चौहान (पुना क्‍लब).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.