आदेशांची पायमल्ली; अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या गैरसोयीबरोबर उद्धट वर्तन
सातारा – जिल्ह्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील सर्वांनाच पेट्रोल, डिझेल पुरवठा करण्याचा राज्य तसेच जिल्हा प्रशासनाचा आदेश असतानाही शहरी भागातील आणि महामार्गावरील पेट्रोल पंपचालकांकडून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांची अडवणूक केली जात आहे. याशिवाय त्यांच्याशी उद्धट वर्तन केले जात आहे.
जगभरातील देशांबरोबरच भारतातही विशेषतः राज्यात करोनाचे रुग्ण वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यातही सर्वत्र कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, किराणादुकाने, भाजी, दूध, मेडिकल, आरोग्यसेवेतील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, मीडिया, बॅंका, पेट्रोलपंप यासह अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांचीच महामार्गावर असणाऱ्या पेट्रोल पंपचालकांकडून अडवणूक केली जात आहे. या प्रकारामुळे अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या सध्या दोन आहे.
ती वाढू नेय यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सर्व काही बंद असल्याने जनतेचे हाल होऊ नयेत, कोणी आजारी पडल्यास त्यांना योग्य उपचार मिळावेत, शहरांसह गावात स्वच्छता राहावी, पैशांअभावी जनतेचे हाल होऊ नयेत यासह इतर बाबींचा विचार करून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांमध्ये बरेचसे ग्रामीण भागातील आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंदद असल्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी स्वतःच्या वाहनाशिवाय पर्यायही राहिला नाही.
मात्र, या वाहनांना पेट्रोल देतानाही पंप चालक मालकाकडून अडवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे अडवणूक करण्याबरोबरच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या या पंपचालकांकडून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांनाच कायद्याचे डोस पाजले जात आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांची अडवणूक करू नये, असे आदेश मंत्री महोदय, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांनाही अत्यावश्यक कामांसाठी डिझेल पुरवठा करण्याचा आदेश असताना काही पेट्रोल पंपचालकांकडून अडवणूक केली जात आहे. सातारा शहरातही काही पेट्रोल पंपांवर पत्रकार व डॉक्टरांना पेट्रोल, डिझेल नाकारले जात आहे. त्याचबरोबर डेबिट कार्डद्वारे पेमेंट स्वीकारले जात नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. अशा पेट्रोल पंपचालकांना योग्य समज द्यावी. प्रसंगी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.