पुलवामा आत्मघातकी हल्ल्यातील वाहनाचा लागला शोध-मालक फरारी 

नवी दिल्ली – पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा आणि त्याच्या मालकाचा शोध लागला आहे. राष्ट्रीय अन्वेषन संस्था एनआयए ने घटनास्थळीचे वाहनाच्या अवशेषांवरून आणि फोरेन्सिक व ऑटोमोबाईल तज्ज्ञांच्या मदतीने आत्मघातकी हल्ल्यात वापरण्यात आलेल्या वाहनाचा शोध लागल्याचे निवेदन दिले आहे. ती एक मारुती ईको मिनी व्हॅन होती. तिचा मालक आहे दक्षिण काश्‍मीरच्या अनंतनागमधील रहिवासी सज्जाद भट. मात्र सज्जाद भट हा फरारी असून 23 तारखेला त्याच्या निवासस्थानी गेलेल्या एनआयएच्या अधिकाऱ्यांना त्याचा शोध लागला नाही. सज्जाद भट जैश-ए-मोहम्मदला सामील झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा हाती शस्त्रे घेतलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली मारुती ईको 2011 मध्ये अनंतनागच्या हेवन कॉलनीतील एका रहिवाशाला विकण्यात आली होती. त्यानंतर सात वेळा मालक बदलून ती सज्जाद भटच्या हाती आली. सज्जाद भटने आत्मघातकी हल्ल्यापूर्वी दहा दिवस, 10 फेब्रुवारी रोजी ही मारुती ईको मिनी व्हॅन खरेदी करून फिदायीन हल्लेखोराला दिली होती. तेव्हापासूनच तो फरार आहे. 14 फेब्रुवारीला श्रीनगर-जम्मू महामार्गावर सीआरपीएफच्या वाहनांच्या तांड्यावर झालेल्या आत्मघातकी वाहन हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान मारले गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.