1019 लसीकरण केंद्रांची स्थापना
पिंपरी – शहरामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार येत्या रविवारी (दि. 31) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत 5 वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 1019 लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. तरी, नागरिकांनी 5 वर्षाखालील बालकांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
मनपा परिसरात लसीकरण केंद्रांमार्फत विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 55 वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 215 पर्यवेक्षक व लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे विविध स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम, मनपा शिक्षक व उपशिक्षक, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रीडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, “आशा’ व इतर स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
महानगरपालिकेने पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण 1019 लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने व रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा 908 ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी 38 ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी 73 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉलपेंटींग आदी माध्यमाद्वारे करण्यात आला आहे.
तरी आपल्या घरातील व आपल्या शेजारी राहणाऱ्या 5 वर्षांखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करून घ्यावे. पालकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतर ठेवावे. तसेच, मास्क वापरण्याची खबरदारी घ्यावी. या मोहिमेचे आयोजन आयुक्त हर्डीकर, महापौर ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केले आहे.