शहरात 1,400 बुथवर लसीची सुविधा
पुणे – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून शहरात सुमारे 1,400 बुथवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना ही लस दिली जाणार आहे.
महानगरपालिकेकडून कार्यक्षेत्रात सर्व प्रभागनिहाय एकूण 1,400 पोलिओ बूथ उभारण्यात आली आहेत. त्या अंतर्गत शहरातील 3 लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने निश्चित केले आहे.
दरम्यान, रविवारसह पुढील पाच दिवसही प्रशासनाकडून शहरात ही लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून त्यात रेल्वेस्थानक, बस स्थानक, उद्याने, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बुथ कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून 3 हजार 960 स्वयंसेवक, 280 पर्यवेक्षक, 15 मुख्य पर्यवेक्षक, तसेच पुणे महानगरपालिकेचे 100 डॉक्टर्स, 5 विभागीय अधिकारी, पुणे महानगरपालिकेच्या नर्सेस व इतर कर्मचारी व्यतिरिक्त खाजगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, रोटरियन्स, नर्सेस कॉलेजचे विद्यार्थी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व्यतिरिक्त महिला बालविकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक यांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे डॉ. हंकारे यांनी सांगितले.