केपटाऊन – दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव सुरू असताना चेतेश्वर पुजाराकडून टेंबा बवुमाचा झेल सुटला व चेंडू हेल्मेटला लागला. यामुळे दक्षिण आफ्रिकेला पेनल्टीच्या पाच धावा बहाल करण्यात आल्या. मात्र, त्यामुळे बवुमाला जीवदान मिळाले व त्याने किगन पीटरसनसह महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि त्याचा फटका भारतीय संघाला बसला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 50 वे षटक शार्दुल ठाकूर टाकत होता. शार्दुलचा एका चेंडू बवुमाच्या बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये गेला. पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या पुजाराला हा झेल घेता आला नाही व त्याच्या हातातून निसटलेला चेंडू हेल्मेटला लागला.
क्रिकेटच्या नियमानुसार जर चेंडू हेल्मेटला लागला तर फलंदाजी करत असलेल्या संघाला पाच धावा बहाल केल्या जातात. मात्र, या धावांची पेनल्टी भारताला फारशी महागडी ठरली नाही, तर त्यानंतर बवुमाने केलेली भागीदारी नुकसानकारक ठरली.