महालक्ष्मी मंदिरात देवदासींच्या मुलींचे पूजन

पुणे – “या देवी सर्वभूतेषु, शक्तिरुपेण संस्थिता, नमस्तयै नमस्तयै नमो नम:’ या मंगल स्वरांनी महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. आपले पूजन होत असल्याचे दृश्‍य पाहताना प्रत्येक चिमुकलीच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच होता. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कन्यापूजन करताना मुलींचे पाद्यपूजन, औक्षण करून त्यांना भेटवस्तू देखील दिल्या.

सारसबागेच्या महालक्ष्मी मंदिराच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात देवदासींच्या मुलींच्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी, मनीषा अर्नाळकर, शुभांगी आफळे, चरणजीत सिंग, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्‍वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्‍वस्त अमिता अग्रवाल, विश्‍वस्त ऍड. प्रताप परदेशी आदी उपस्थित होते. कन्यापूजनानंतर सर्व मुलींना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप करण्यात आले.

वेदकाळापासून कन्यापूजन हे महापुण्याचे काम मानले जाते. पुढची पिढी ही स्त्रियांच्या हातामध्ये आहे. मुलांवर संस्कार घडवून त्यांना समाजात स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम प्रत्येक घरातील स्त्री करीत असते. त्यामुळे हे कन्यापूजन आज देखील सुरू असणे ही चांगली बाब आहे. देवीची अनेक शक्ती रुपे आहेत आणि त्यामुळेच आपण या पृथ्वीवर चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहोत, असे प्राजक्ता माळी म्हणाल्या.

शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणाऱ्या मातांची रुपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींमध्ये ही रुपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरुप असते. मात्र, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करायला हवे. तरच देवी प्रसन्न होईल. कुटुंबात मुलगी होणे, ही गर्वाची बाब आहे, असे अग्रवाल म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.