वडूज-पुसेगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे

वडूज  –  वडूज ते पुसेगाव या अठरा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी हा रस्ता दोन्ही बाजूला खचला आहे. या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वडूज ते पुसेगाव हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या मार्गावर सतत दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ असते. वडूजपासूनच या रस्त्यावरील खड्डयांना सुरूवात होते.

शिवराज पेट्रोल पंपानजिकच्या ओढ्यात रस्ता खचला आहे. शिवाय याठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यापुढे सातेवाडी कॉर्नर, वाकेश्‍वर फाटा, भुरकवडी यामार्गावर देखील अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याशिवाय यामार्गावर काही ठिकाणी रस्त्यावर आडव्या चरीचे खड्डे पडले आहेत, सततच्या वाहनांच्या वर्दळीने या चरीदेखील खोल झाल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहने जोरात आपटत आहेत. खटाव ते खातगुण दरम्यानही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत.

खातगुण फाट्यानजीकच्या ओढ्यात तर दोन्ही बाजुंनी रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला आहे. शिवाय रस्त्याच्या मध्यभागीच मोठे खड्डे पडल्याने खड्डा चुकवायचा की खचलेल्या रस्त्यात गाडी घालायची असा प्रश्‍न वाहनचालकांना पडतो. काटकरवाडी ते पुसेगाव मार्गावरही अनेक ठिकाणी रस्ता खड्ड्यांनीच व्यापला आहे. या मार्गावर असणाऱ्या दोन- तीन ओढ्यांतही रस्त्याची अवस्था बिकटच आहे.

वडूज ते पुसेगाव या अठरा किलोमीटर लांबीच्या प्रवासात वाहनचालकांना अनेक खड्ड्यांचा सामना करीतच प्रवास करावा लागतो. वडूज अथवा पुसेगाव येथे पोहोचल्यानंतर वाहन चालक सुटकेचा नि:श्‍वास टाकत आहेत. प्रवाशांनाही या मार्गावर जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे. संबंधितांनी या मार्गावरील खचलेला रस्ता त्वरित दुरूस्त करावा तसेच पडलेले खड्डे बुजवावेत अशी वाहन चालकांतून मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.