“प्रभात’चा हटके कार्यक्रम वकील डायरीचे प्रकाशन…

करोनाच्या संकट काळात, करोना संबंधिची दैनिक माहिती देणे, आरोग्य केंद्राबद्दल जनतेला माहिती देवून आरोग्या बद्दल प्रबोधन करणे, नागरीकांना प्रशासनातर्फे आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे बाबत प्रोत्साहन देणे, शिक्षणाच्या संदर्भात ऑनलाइन – ऑफलाइन कार्याबाबत विद्यार्थी पालकांना प्रोत्साहन देणे असे भरीव कार्य “दैनिक प्रभात’ करीत आला आहे.

नुकताच एक आगळा-वेगळा कार्यक्रम घेवून नगर जिल्ह्यात नवा पायंडा पाडला आहे. वकिलांसाठी डायरीचे प्रकाशन व वितरण करुन त्यांच्या कार्याला जणू सलाम केला आहे. बातमी वाचत असताना लक्षात आले की, सर्वच वक्‍त्यांनी तोंड भरुन या उपक्रमाचे कौतूक केले. या कालखंडामध्ये न्यायदानाच्या कार्यात सतत अडथळे येत होते. कामकाज नसल्यामुळे एक प्रकारचे नैराश्‍य आले होते. या सोहळ्यामुळे एक चैतन्य निर्माण झाले.

माझे स्नेही डॉ. संजय कळमकर एक अफलातून व्यक्तीमत्व आहे. विषयाला धरुन, विनोदाची झालर देवून, फटकेबाजी करीत सभागृहाचे प्रबोधन भरण्याची त्यांची शैली मला ज्ञात आहे. या कार्यक्रमात “”वक्‍त्यांची कुचंबना, श्रोत्यांनी सुटकेचा सोडलेला श्वास, कोर्टाची पायरी, वकील अलीप्त जीवन जगतात, न्यायव्यवस्थेबाबत चिंता, एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व, करोनाचा पेपर शेवटाकडे आला आहे, असे मार्मीक उद्‌गार काढीत कार्यक्रमामध्ये त्यांनी रंगत तर आणलीच पण त्याच बरोबर कार्यक्रमाचे कौतूकही भरपूर केले.

प्रभातच्या नगर आवृत्तीने मोठ्या कल्पकतेने घेतला आहे. त्याबद्दल निवासी संपादक व त्यांची संपूर्ण टीम यांचे अभिनंदन. अशा कार्यक्रमांना वाचकांचे काही प्रतिनिधी बोलावले तर अधिक चांगले असे वाटते. त्याचप्रमाणे समाजातील विविध घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी असे, काही अन्य कार्यक्रम भविष्यात घेत जावेत ही विनंती.
– प्रा. मधुसूदन मुळे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.