झोपडपट्ट्यांमधील स्थिती : दांडेकर पूल परिसरात करोनाबाधित वाढले
पुणे – झोपडपट्टी भागांत वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्यासाठी जागा नाही. त्यामुळे या भागात नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे. मात्र, अशा ठिकाणी करोनाबाधित तसेच संशयित व्यक्तीही ही स्वच्छतागृहे वापरत असल्याने करोनाचा प्रसार वाढत असल्याचा प्रकार दांडेकर पूल परिसरात समोर आला आहे.
दांडेकर पूल स. नं 214 येथे लोकमान्यनगर पोस्ट ऑफिससमोरील भागात आठवडाभरात जवळपास 8 करोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच या सर्व रुग्णांचे घर वेगवेगळे असले, तरी त्यांचे स्वच्छतागृह एकच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहे करोनाच्या प्रसाराचे वाहक ठरत असल्याचे चित्र आहे. शहरात करोनाचा प्रसार गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे.
सुरूवातीला परदेशातून आलेल्या नागरिकांपर्यंत असलेला हा आजार आता थेट झोपडपट्टी भागात घुसला आहे. त्यामुळे दाट लोकवस्ती आणि राहण्यासाठी अपुरी जागा, एकाच घरात डझनभर नागरिक अशी स्थिती असल्याने शहरातील काही मोठया झोपडपट्ट्या करोनाचे केंद्र बनल्या आहेत.
या भागात प्रशासन आता करोना रोखण्यासाठी उपाय योजना करत असले, तरी दांडेकर पूल परिसरात काही रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने घेतलेल्या माहितीत सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर केल्याने या भागात रुग्णसंख्या 2 वरून आठवर गेल्याचे समोर आले आहे. या सर्व रुग्णांचे घर एकमेकांपासून 10 ते 15 मीटर दूर असून यांच्या घरांमध्ये इतर पाच ते सहा घरे आहेत. मात्र, त्या घरांमध्ये कोणालाही बाधा झालेली नाही.
पालिकेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची तीन वेळा स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण केले जात असले, तरी अनेक व्यक्ती ही स्वच्छतागृहे वापरत असल्याने ही स्वच्छतागृहे करोना प्रसाराची ठिकाणे बनत आहेत.