सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर ठिकठिकाणी मोर्चे आणि निषेध आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे हा पुतळा उभारून फक्त 8 महिने झाले होते.
नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं.
मालवणमध्ये विराट मोर्चा
या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या शासन प्रसासनाच्या या भ्रष्टकारभाराचा निषेध करण्यासाठी मालवणात विराट जनसंताप मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक शिवप्रेमीं नागरिकांच्या मनात उफाळलेला तिव्र संताप शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि या दुर्घटनेमागच्या सर्व सूत्रधारांना कायमची अद्दल घडविण्यासाठी उद्या बुधवार 28 ॲागष्ट रोजी सकाळी 10 वाजता मालवण भरड दत्तमंदिर येथून बाजारपेठ मार्गे तहसिलदार कार्यालयावर हा जनसंताप मोर्चा काढला जाणार आहे.
शिवप्रेमींना केले आवाहन
या विराट जनसंताप निषेध मोर्चात तमाम शिवप्रेमी नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना शाखा मालवण- महाविकास आघाडी व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश
सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. तसेच 20 ऑगस्टला महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी नौदलाला पत्र देखील देण्यात आलं होतं. पुतळ्यावर समुद्राच्या पाण्याची खारी हवा बसल्याने डस्ट जमा होऊन पुतळा कोसळला असावा, असा कयास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. तर पुतळा उभारला त्यांच्यावर सुमोटो दाखल करण्याचे आदेश मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.