पुणे – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांना 500 रुपयांच्या दंड तसेच कोणताही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळल्यास 1 हजार रुपये करोना संसर्गजन्य आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून दंड आकारण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.
पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागांत करोनाचा फैलाव वाढतो आहे. तो रोखण्यासाठी सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना, फिरताना आपल्या तोंडावर मास्क घालणे आवश्यक आहे.
तथापि, अशाप्रकारे मास्क न घालता नागरिक फिरताना दिसतात. अशांमुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार पोलीस, पोलीस मित्र, आरोग्य सेवक, महापालिका कर्मचारी यांना देण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी आदेशात म्हटले आहे.